काळीज पिळवटून टाकणारी घटना! वायनाडमधील भूस्खलनात अख्खं कुटुंब गमावलं, आता अपघातात होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू
केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये जुलै 2024 मध्ये प्रलयकारी भूस्खलन झाले. या भूस्खलनामध्ये शेकडो लोकांनी प्राण गमावले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. यात श्रुती (वय – 24) या तरुणीचाही समावेश असून तिचे अख्खं कुटुंब या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. या दु:खातून सावरत नाही तोच तिच्या आभार कोसळले आहे. बुधवारी एका रस्ते अपघातामध्ये श्रुतीचा होणारा नवरा जेन्सन याचा मृत्यू झाला.
कार अपघातात जेन्सनला गंभीर दुखापत झाली होती. त्याची प्रकृती गंभीर होती आणि रात्री साडे आठच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या नाकातून जास्त प्रमाणात रक्तस्राव होत होता आणि त्याच्या मेंदूमध्ये गंभीर दुखापत झाली होती, अशी माहिती डॉ. मूपेन मेडिकल कॉलेजच्या प्रवक्त्यांनी दिली. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
जेन्सनचा अपघात मंगळवारी झाला होता. त्याची कार आणि एका खासगी बसमध्ये समोरासमोर धडक झाली. या कारमध्ये जेन्सन आणि श्रुतीच्या कुटुंबातील अनेक सदस्य होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने ते या अपघातातून बचावले. मात्र गंभीर जखमी झालेल्या जेन्सनला वाचवण्यात अपयश आले.
वायनाडमध्ये मेपाड्डा पंचायतीच्या हद्दीतील चुरलमाला व मुंडक्काई येथे 30 जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामध्ये श्रुतीच्या कुटुंबातील 9 सदस्यांचा मृत्यू झाला होता. यात तिचे आई-वडील शिवन्ना व सबिता, धाकटी बहीण श्रेया यांचाही समावेश होता. यानंतर तिचा एकमेव आधार असलेल्या होणाऱ्या नवऱ्यालाही काळाने तिच्यापासून हिरावून घेतले.
2 जून रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता. डिसेंबरमध्ये मोठ्या थाडामाटात लग्न करण्याचा प्लॅन दोघांनी केला होता. सप्टेंबरमध्ये दोघेही रजिस्टर्ड पद्धतीने लग्न करणार होते. मात्र कार अपघातात जेन्सनचा मृत्यू झाल्याने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List