तुम्ही खात असलेले पनीर शुद्ध आहे की भेसळयुक्त घरच्या घरी कसे ओळखाल? वाचा सविस्तर
काही दिवसांपूर्वी शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर सापडल्याचे समोर आले होते. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सार्थक सचदेवा गौरी खानच्या हॉटेलमध्ये गेला आणि तिथे पनीरवर चाचणी केली. ही चाचणी सार्थकने आयोडीनच्या माध्यमातून केली होती. सार्थकने पनीरवर आयोडीनचे काही थेंब टाकले. यामुळे पनीरचा रंग लगेच बदलला. त्यानंतर सार्थकने हे पनीर बनावट असल्याचे म्हटले होते.
सार्थकने पनीरवर केलेल्या टेस्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर गौरी खानच्या रेस्टाॅरंटकडूनही प्रतिक्रिया आली. यामध्ये रेस्टॉरंटने म्हटले होते की, कोणतीही आयोडीन चाचणी ही पनीरमधील स्टार्चचे प्रमाण दाखवते. परंतु यावरून भेसळयुक्त पनीर ओळखता येत नाही. पनीरमध्ये असलेले सोयाचे घटक सर्वाधिक असतात. त्यामुळे आयोडीन चाचणीमध्ये असा निष्कर्ष येणं हे खूप स्वाभाविक होतं. यानंतर मात्र हा वाद तिथेच बंद झाला. परंतु यानंतर जनसामान्यांमध्ये आपण भेसळयुक्त पनीर कसे ओळखायला हवे यावर चर्चा सुरु झाली.
पनीर आपल्या आहारात सध्याच्या घडीला अगदी सढळहस्ते समाविष्ट झाला आहे. आपल्याकडे पनीरपासून विविध पदार्थ करण्याचे प्रमाण हे दिवसागणिक वाढत आहे. परंतु पनीर खातान ते भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखणेही तितकेच गरजेचे आहे. बाजारातून पनीर खरेदी करणं सोयीस्कर असल्यामुळे, सध्या सर्वचजण बाजारातून पनीर खरेदी करु लागले आहेत. भेसळयुक्त पनीर खाल्ल्यामुळे फूड पाॅयझनचा धोका अधिक प्रमाणात असतो. त्यामुळेच आपण घरच्या घरी काही गोष्टी तपासून घ्यायला हव्यात.
भेसळयुक्त पनीर कसे ओळखावे?
बाजारातून पनीर आणल्यावर, पनीर साध्या पाण्यात ठेवावे. या पाण्यात तूर डाळीचे पीठ किंवा सोयाबीनचे पीठ टाकावे. किमान 10 मिनिटे पीठ टाकून तसेच ठेवावे. त्यानंतर पनीरचा रंग हलका लाल होऊ लागला तर समजावे हे पनीर भेसळयुक्त आहे.
बाजारातून आणलेल्या पनीरवर काही थेंब आयोडीन टिंचरचे टाकावे. आयोडीन टिंचरचे थेंब टाकल्यानंतर, पनीरचा रंग काळानिळा पडल्यावर समजावे की, हे पनीर भेसळयुक्त आहे.
मधुमेहींनी पनीर खाणे का आहे गरजेचे! वाचा पनीरचे आरोग्यासाठी होणारे फायदे
पनीर घेताना किमान एका चिमटीमध्ये टेस्ट करुन बघावे. चिमटीत घेतलेले पनीर लगेच तुटल्यावर ते भेसळयुक्त आहे असे समजावे. अशा पनीरचे सेवन केल्यास पोट खराब होण्याचा धोका असतो.
पनीर थोडसे टेस्ट करताना ते गोड आणि मलाईदार लागायला हवे. कच्चे पनीर हे चिवट लागल्यावर ते भेसळयुक्त आहे असे समजावे.
पनीरचा तुकडा कोमट पाण्यात घालावा. किमान 5 ते 10 मिनिटे तसेच ठेवून द्यावे. पनीर चिवट झाले तर, ते भेसळयुक्त आहे असे समजावे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List