1 वाटी आमरस, 1 मोदक खायला दीड कोटी खर्च करता, पण शेतकऱ्यांसाठी 1 रुपया नाही, राजू शेट्टी यांचा हल्ला
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आपल्या घरी एक वाटी आमरस आणि एक मोदक खायला घालण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च करून हॅलिपॅडही बांधता, मात्र शेतकऱ्यांना एक रुपयाही देत नाही, याची लाज वाटत नाही का? असा संतापजनक सवाल शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आज सरकारला केला.
राजू शेट्टी नाशिक दौऱ्यावर असून पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार पुण्यतिथी दिवशी गृहमंत्री अमित शहा रायगड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल दीड कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. याबाबत त्यांनी ‘एक्स’वर सविस्तर पोस्ट केली आहे. दरम्यान, सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने परभणी जिह्यात दीड लाख रुपयांच्या कर्जापायी शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच रात्री त्याच्या पत्नीनेही आत्महत्या केली. ती सात महिन्यांची गरोदर होती, असेही राजू शेट्टी म्हणाले.
असा झाला खर्च
अमित शहा तटकरे यांच्या घरी सुतारवाडीत हॅलिकॉप्टरने उतरले. हॅलिकॉप्टर उतरवण्यासाठी 4 युनिटचे हॅलिपॅड बनवण्यात आले. यासाठी 7 एप्रिल रोजी 1 कोटी 39 लाख रुपयांचे टेंडर काढले. 9 एप्रिल रोजी एका वर्तमानपत्रात हे टेंडर छापून आले होते.
शेतकऱ्यांच्या ‘कर्जमाफी’चे काय झाले?
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली होती, त्याचे काय झाले, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. सोयाबिन शेतकऱ्यांना मदत होत नाही. मंत्रालयात आम्ही कांदे घेऊन आंदोलन केले होते. जेलमध्ये गेलो. सरकारला शहाणपण आले. कांद्याचे निर्यात शुल्क माफ केले. मात्र वेळेवर निर्यात शुल्क माफ केले नसल्यानेच कांद्याचे भाव पडल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. सरकारने कांद्याला 1500 रुपये हमी भाव द्यावा, आमचा नाफेडवर भरोसा नाही, असेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List