संस्कृती-सोहळा – लोकदैवतांचे चैत्रोत्सव
>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
संतांनी रचलेल्या वासुदेवाच्या रूपकात ‘अवघा क्षेत्रपाळ पुजावा सकळ’ असा उल्लेख आहे. या क्षेत्रपाळ देवतांच्या उपासनेतील काही अघोरी प्रथांचा संतांनी अधिक्षेप केला आहे. त्यावर टीका केली आहे. मात्र एका बाजूला अघोरी प्रथांचा अधिक्षेप केलेला असतानाच दुसरीकडे मात्र संतांनी क्षेत्रपाळ देवतांची महतीही गायली आहे. इतकेच नव्हे तर त्यांची सदासर्वकाळ पूजा करावी, असे सांगितले आहे. त्याचे कारण असे की, मराठी लोकधर्मात भक्ती संप्रदायाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व क्षेत्रपाळ देवतांच्या लोकदैवत संप्रदायाला आहे. किंबहुना पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांचे तुष्टीकरण, त्यानंतर शेताची आणि गावाची राखण करणाऱया राखणदार क्षेत्रपाळ देवतांची पूजा ही यातुक्रिया, विधी, कुलधर्म-कुळाचार म्हणजेच देवकार्य यातून बांधली गेली आहे. कारण क्षेत्रपाळ देवता या सकाम भक्तीच्या देवता असून त्यांचा कोप होऊ नये आणि त्यांचे वरदान लाभावे म्हणून त्यांची पूजा केली जाते.
साधारणत होळीपासून पुढे अक्षय्य तृतीयेपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून ग्रामोत्सव सुरू असतात. त्यामध्ये चैत्र महिन्यातील ग्रामोत्सवांची संख्या अधिक आहे. शिव आणि शक्तीची विविध रूपे म्हणजेच या क्षेत्रपाळ देवता. मग ती सातेरी असो, रवळनाथ असो, भैरवनाथ असो, भराडी असो अथवा इकडे पश्चिम महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला धूमधडाक्यात भंडार म्हणजे हळदकुंकू आणि गुलाल यांच्या उधळणीत सुरू असलेली कोल्हापूरजवळची ज्योतिबाची यात्रा असो, फलटणची म्हसोबाची यात्रा असो, जेजुरीच्या खंडोबाची यात्रा असो, सातारा जिह्यातील पालीमधील खंडोबाची यात्रा असो. अगदी या यात्रांमधून पीरही सुटलेले नाहीत. यात्रा-जत्रांचा हा चैत्रोत्सव म्हणजे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे वैभव आहे. केवळ कुळधर्म कुळाचार नव्हे, तर या ग्रामोत्सवांमधून सगळे गाव एकत्र येते, सर्व जातीपाती एकत्र येतात. माणूस या ग्रामोत्सवाचा अविभाज्य घटक असतो. त्यातून देवकार्यासोबत सामाजिक सलोखा आणि ग्रामविकासाला चालना मिळते. क्षेत्रपाळ देवतांमध्ये शिवकुलातील मुंजोबाचीदेखील गणना होते. पिंपळाखालच्या मुंजोबाची यात्रा हादेखील ग्रामोत्सवातील विशेष असतो. पुणे जिह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, पिंपळगाव येथे अशी मुंजोबाची यात्रा मोठय़ा थाटात पार पडते. रामनवमीच्या सुमारास एका बाजूला भक्ती संप्रदायाचा कीर्तन सप्ताह सुरू असतो, तर दुसरीकडे मुंजोबाच्या यात्रेसारख्या क्षेत्रपाळ देवतांच्या काठय़ा नाचवल्या जातात. मग म्हसोबाची काठीही नाचते आणि बगाडही काढले जाते.
खंडोबा यात्रेचे वर्णन अनेक संतांनी केले आहे. ‘जेजुरी वर्णन’ या प्रकरणात संत रामदास स्वामी यांनी खंडोबाच्या जागरणाचे चित्र रेखाटले आहे ते असे –
रात्रभागी निवांत वेळा। ठाई ठाई गायनी कळा ।
वाटे नेणो गाती कोकिळा । दास म्हणे विवेक बळे । सकळामध्ये परि निराळे, तोचि सुख सर्वा आगळे ।।
शिवदौन केसरी यांनीदेखील जेजुरीच्या यात्रेचे वर्णन केले आहे ते असे…
‘दिवटय़ा कोटी असंख्यात। मुरळ्या वाघे नृत्य करीत।
येळकोट येळकोट अवघे म्हणत।।
अन् हात वाजंत्री यांची घाई । तुझे रे ठाई ठाई ।
किती भंडार दिशा दाही । अखंड उधळे निजरंगी ।।
चैत्र पौर्णिमेला खंडोबाची ज्या-ज्या ठिकाणी ठाणी आहेत, तेथे भव्य यात्रा सुरू असतात. पुणे जिह्यातील जुन्नर तालुक्यातील धामणखेल, वडज ही खंडोबाची जागृत देवस्थाने आहेत. तेथे चैत्र पौर्णिमेला यात्रा होते. भंडार-खोबऱयाची तळी भरली जाते. त्या वेळी ‘सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले, अंबाबाईचा उदो उदो…’ अशी नामगर्जना करीत भंडारा आणि खोबरे उधळले जाते. बैलगाडय़ांच्या शर्यती होतात. जागोजाग वाघ्या-मुरळ्यांची जागरणे होतात. वडजच्या खंडोबाचे भक्त सीए नामदेव चव्हाण यांनी ‘खंडोबा हा शूर सरदार कसा होता’ यावर इंग्रजीमध्ये ग्रंथ लिहिला आहे.
तमाशाची पंढरी नारायणगाव येथे मुक्ताईची भव्य यात्रा किमान चार-पाच दिवस सुरू असते. त्यात खेडकर भाऊ बापू यांना मानवंदना देणारी मिरवणूक, चोळी-पातळ छबिना, कळशांची मिरवणूक, रोषणाईचे दारूकाम असे वेगवेगळे कार्यक्रम होतात, कुस्त्यांचा आखाडा होतो. महाराष्ट्रातल्या विविध यात्रा-जत्रांमध्ये अशीच परंपरा सुरू असते. कोकणात मात्र प्रत्यक्ष ग्रामजत्रेचा हंगाम शिमग्यापूर्वी संपलेला असतो. त्यानंतर तरंग मिरविणारी जत्रा होत नाही, तर दशावतारी नाटके होतात. मोचेमाडकर, चेंदवणकर, कलिंगण, गोरे पार्सेकर यांसह एकूण नऊ पारंपरिक दशावतारी मंडळे गावोगाव खेळ करत असतात. साधारणत तुळशीच्या लग्नानंतर प्रत्येक गावातले हे दशावताराचे खेळ सुरू असतात, असे ‘गोरे दशावतारा‘चे प्रमुख बाळकृष्ण गोरे यांनी सांगितले.
ग्रामोत्सव दोन प्रकारचे असतात – जेथे लोकदेवतेला सामिष नैवेद्य दाखविला जातो आणि घरोघर सामिष प्रसाद शिजविला जातो ती जत्रा, असे समजण्याचा प्रघात आहे, तर ज्यामध्ये कीर्तने होतात, भारुडे होतात, लळित होते, त्या लोकदैवतांच्या यात्रा असतात. जत्रेत तमाशा सादर होतो. साधारणत शिमग्यानंतर नारायणगाव आणि फलटण या ठिकाणी तमाशाच्या तंबू-राहुटय़ा पडतात आणि तिथे गावोगावचे पुढारी तमाशा ठरविण्यासाठी आणि सुपारी देण्यासाठी येतात. रघुवीर खेडकर, विठाबाई नारायणगावकर, मालती इनामदार, मंगला बनसोडे, अंजली नाशिककर, भिका भीमा सांगवीकर, काळू बाळू, किरण ढवळपुरीकर, विवेकानंद मांजरवाडीकर असे सुमारे 50 च्या वर फड, तंबू, राहुटय़ा पडतात.
रात्री दहाच्या पुढे तमाशा उभा राहतो. ढोलकी-हलगीची सलामी, त्यानंतर गण, गणानंतर मुजरा, मुजऱयानंतर गवळण, त्यानंतर रंगबाजी आणि शेवटी वग असे या तमाशाचे सूत्र असते. पहाटेपर्यंत तमाशा चालतो आणि त्यानंतर लगेच सकाळी दहाच्या पुढे एखाद्या पारावर तमाशा कलावंतांची हजेरी सुरू होते. हजेरीचे स्वरूप पारंपरिक तमाशाचे असते. मात्र रात्रीच्या तमाशात रंगबाजीमध्ये चित्रपटातील गाणी आणि त्यावरील नृत्य होते. पूर्वीच्या काळी भागवत संप्रदायाचा प्रभाव असणाऱया गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू असायचे. रामनवमीच्या उत्सवात अथवा हनुमान जयंतीच्या उत्सवात होणाऱया या कीर्तन-सप्ताहांची सुरुवात गुढीपाडव्याला होत असे आणि काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी रात्री लळिताचा कार्यक्रम सादर होत असे. लळित म्हणजे पुरातन काळाचे नाटक. भागवत संप्रदाय लळित, हरदास लळित, महानुभावांचे लळित, असे लळिताचे अनेक प्रकार आहेत. चैत्र महिन्यात बोहाडा, चैती, आखाडी, पंचमी असे सोंगांचे प्रकार ग्रामोत्सवात सादर होतात. दत्त जयंतीला अंबेजोगाईचे दासोपंतांचे लळित सादर होते, तर मराठवाडय़ातील जालना जिह्यातील अंबड येथे रामानंदांचे लळित सादर होते. या लळितात भालदार-चोपदार, वासुदेव, काशी-कापडी, वाघ्या, भुत्या सौरी, मुंडा अशी सोंगे रात्रभर सुरू असतात, तर बोहाडय़ामध्ये गणपती, रिद्धी-सिद्धी, त्राटिका, राम-लक्ष्मण, भैरवनाथ, रावण, खंडेराय अशी सोंगे रात्रभर सुरू असतात. पालघर जिह्यातील मोखाडा येथे बोहाडय़ाची मोठी परंपरा आहे.
एकूणच महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमध्ये लोकदैवतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांचे उत्सव शिमग्यापासून थेट पुढे अक्षय्य तृतीयेपर्यंत सुरू असतात, पण खास काळ म्हणजे चैत्र महिना. या महिन्यात झाडांना जशी हिरवीगार चैत्रपालवी फुटावी, तसे हे ग्रामोत्सव सुरू असतात आणि असे हे ग्रामोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आनंदनिधान!
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List