महाराष्ट्राच्या चर्चेत फक्त ‘ठाकरे’, मराठी मनं सुखावली; सोशल मीडियावर शुभेच्छांचा महापूर
महाराष्ट्रातील राजकारणाचा तीन अक्षरी मंत्र म्हणजे – ‘ठाकरे’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असंख्य घडामोडी घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भाजप सत्तते आल्यानंतर तर महाराष्ट्राच्या राजकारणाने कधीही अनुभवलेले नव्हते असे प्रसंगही पाहिले. मात्र महाराष्ट्र कायमच देशाच्या राजकारणाला दिशा देणारं राज्य ठरलं आहे. आताही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या सादाला प्रतिसाद देत महाराष्ट्रात नव्या राजकारणाचे संकेत दिले आहेत.
राज ठाकरे यांनी शनिवारी दिलेल्या मुलाखतीत, सर्व वाद भांडणं बाजूला ठेवून शिवसेनेसोबत युती करण्याची तयारी दर्शवली. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी देखील मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवून एकत्र येण्यास तयार असल्याचे सांगितले. दोन्ही ठाकरे बंधूंनी घेतलेल्या या भूमिकेनंतर शनिवारी दुपारनंतर अचानक महाराष्ट्रात बदलाचे वारे वाहू लागले. गेली अनेक वर्ष ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची वाट पाहत असलेल्या मराठी माणसात एकच उत्साह संचारला. रेल्वे, बस, चौकात, नाक्यानाक्यावर, घराघरात फक्त एकच चर्चा सुरू होती ती म्हणजे ठाकरे बंधूंचीच. संपूर्ण महाराष्ट्र ज्या हाकेची वाट पाहत होता ती हाक आज दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांना दिल्यामुळे गेली अनेक वर्ष रखरखत्या उन्हात करपून निघालेल्या मराठी माणसाला मायेचा ओलावा मिळाल्यासारखे झाले. मात्र या बदलाच्या वाऱ्यांमुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
महाराष्ट्र म्हटला की ठाकरे परिवार हे समीकरण गेली अनेक वर्ष चालत आलं आहे. प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव व राज ठाकरे या तीन पिढ्यांनी महाराष्ट्रात मराठी माणसाला कायम आधार द्यायचे काम केले. राज ठाकरे 2005 ला शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. काहीही होवो पण मराठीसाठी लढणारे हे दोन्ही भाऊ एकत्र यायला हवे हिच मराठी माणसाची इच्छा होती. 2005 पासून सातत्याने मराठी माणसाकडून दोन्ही भावांनी एकत्र यावे ही मागणी होत राहिली. प्रत्येक निवडणूकीच्या वेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असी मागणी मराठी माणसाकडून होत गेली. गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या या मागणीला अचानक आज दोन्ही भावांकडून प्रतिसाद मिळाला आणि मराठी माणसाच्या मनातही आता हा वनवास संपणार ही आशा पल्लवित झाली आहे.
सोशल मीडियावर शुभेच्छांचा महापूर
उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार या कल्पनेनेच संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह संचारला. राज ठाकरेंच्या सादेला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रा भावूक झाला. सोशल मीडियावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो तुफान स्पीडने व्हायरल होऊ लागला. लोकांनी दोन्ही भावांना एकत्र येण्यासाठी शुभेच्छा द्यायला सुरुवात केली त्यामुळे शुभेच्छांचाही महापूर आला आहे.
राज ठाकरे यांची साद…
महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना अजूनही तुम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं स्वप्न आहे, असा सवाल केला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, भांडणं गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी हे वाद, भांडणं अत्यंत क्षुल्लक आहे. एकत्र येणं व एकत्र राहणं यात मला काही मला फार कठिण गोष्ट वाटत नाही. परंतू विषय इच्छेचा आहे. हा माझ्या एकट्याचा विषय नाही. माझ्या स्वार्थाचा विषय नाही. मला वाटतं आपण महाराष्ट्राचं लार्जर पिक्चर पाहणं गरजेचं आहे.
उद्धव ठाकरे यांचा प्रतिसाद…
माझं मत असं आहे की, मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. मी सुद्धा सर्व मराठी मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की, जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जाताहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची हे असं नाही. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलावणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचा आदर, स्वागत त्याच्या पंक्तीला मी बसणार नाही. हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काही भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटवून टाकली चला. पण पहिले हे ठरवा. महाराष्ट्राचं हित. मग त्यावेळी सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत? असं उद्धव ठाकरे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List