मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी मंत्री उदय सामंतही उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या अचानक भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. तब्बल दीड तास राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेण्याचे कारण काय, याबद्दल भाष्य केले.
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे तब्बल दीड तास एकमेकांशी चर्चा करत होते. ही चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे-शिवसेना युतीबद्दल स्पष्टपणे भाष्य केले. आज कोणतीही युती, महायुतीची चर्चा नव्हती. केवळ आणि केवळी ही सदिच्छा भेट होती, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा
“आज खरं म्हणजे राज ठाकरेंनी मला जेवणाचं निमंत्रण दिलं. त्यासाठी मी आलो होतो. गेले काही दिवसांपासून निवडणुका झाल्यानंतर एक दोन महिन्यांपासून भेटायचं, जेवायला या, एकत्र जेवूया आणि गप्पा मारुया असं आमचं सुरु होतं. त्यामुळे मी आज आलो. ही सदिच्छा भेट होती. स्नेहभोजनही झालं. गप्पा गोष्टी झाल्या. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळाही दिला. बाळासाहेबांचे अनुभव, राज साहेबांचे अनुभव. आम्ही बाळासाहेबांसोबत एकत्र काम केलेले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या. अनेक बाळासाहेबांच्या जुन्या घटनांवर बरीच चर्चा आणि गप्पा झाल्या. अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला हेच कळलं नाही. ही सदिच्छा भेट होती. याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही”, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
“आज सकाळी मी सिमेंट क्राँकीटचे रस्ते पाहिले, त्याबद्दलही राज ठाकरेंनी विचारणा केली. सरकारचं काम कसं चाललंय, मुंबईतील रस्त्यांची काम कशी चालली आहेत याबद्दलही विचारले. अनेक विकासकामांबद्दलही चर्चा झाली. पण राजकीय चर्चा कोणतीच झाली नाही. गप्पा गोष्टींमध्ये आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यामध्ये आमचा एवढा वेळ कसा गेला हे कळलं नाही. ही वस्तूस्थिती आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही
“तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. आम्ही मनमोकळेपणाने बोलणारे नेते आहोत. आम्ही मनात एक पोटात एक ओठात एक ठेवणारे लोक नाही. जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्या काळात राज ठाकरे आणि मी कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्या काळातील काही घडामोडी, काही आठवणींनाही उजाळा दिला. बाळासाहेबांबद्दल जास्त आठवणी आणि अनुभव हा राज ठाकरेंकडे आहे. त्याबद्दलही आम्ही मोठ्या प्रमाणात चर्चा केली. ही खूप चांगली सदिच्छा भेट झाली. चर्चाही झाली. त्यामुळे यात कोणताही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही”, असे शिंदेंनी स्पष्ट केले.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही
“आता आम्ही महायुतीत आहोत. महायुतीचे सरकार आहे. मी नेहमी जाहीरपणे सांगतो की येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महायुती जिंकेल. यापुढेही येणाऱ्या निवडणुकीत महायुती चांगलं यश मिळवेल. त्यामुळे महायुती आहेच. आता निवडणुकांवर चर्चा करण्याची वेळ नव्हती. आम्ही नेहमी तयारीतच असतो. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. निवडणुका आल्या की काम करायचं, कार्यालय उघडायची, तसं आम्ही करत नाही. निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेना ही नेहमी काम करत असते. लोकांच्या अडीअडचणीला धावून जात असते. त्यामुळे निवडणुकांची वेगळी तयारी आम्हाला करावी लागत नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही”, असा टोला एकनाथ शिदेंनी लगावला.
राज ठाकरे आणि आमचे विचार मिळतेजुळते
“आता जवळपास निवडणुका नाही. त्यामुळे निवडणुकांचा माहोल तयार झाल्यावर युती, महायुती ही चर्चा तेव्हा होते. पण आज कोणतीही युती, महायुतीची चर्चा नव्हती. केवळ आणि केवळी ही सदिच्छा भेट होती. जेवणाचे निमंत्रण होते. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. राज ठाकरे हे लोकसभेत मोदींसोबत होते. राज ठाकरे आणि आमचे विचार मिळतेजुळते आहेत. त्यामुळे विरोधकांना चिंता करण्याचे कारण नाही”. त्यांनी काम करावं, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List