अजितदादा, जयंत पाटील भेट; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या मी स्वत:..
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तीस मिनिटांपेक्षा अधिकवेळ चर्चा झाली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र जयंत पाटील यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. आपण कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परंतु आज जयंत पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
बंद दाराआड चर्चा
जयंत पाटील हे जेव्हा अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या कक्षात आले तेव्हा तिथे गर्दी होती. मात्र जयंत पाटील यांनी कक्षात प्रवेश करताच सर्वांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये तीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ बंद दाराआड चर्चा झाली. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
महाराष्ट्रात सशक्त लोकशाही आहे, त्यामुळे लोक एकमेकांना भेटत असतात. मी स्वत: अश्विनी वैष्णव यांना अर्धा तास भेटून आले आहे. बारामतीच्या विकासासंदर्भात ही बैठक होती. शिवराज सिंह चौहान, अमित शाह यांना देखील आम्ही भेटत असतो. लोकशाहीमध्ये भेटी गाठी झाल्या पाहिजे, संवाद झाला पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जेव्हापासून हे सरकार आलं आहे, तेव्हापासून 100 दिवसांत या सरकारचं सगळ्यात मोठं योगदान हे आहे की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे, या शंभर दिवसांमध्ये एका मंत्र्याची व्हिकेटही गेली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मी गेल्या महिन्यापासून हेच सांगत आहे, की महाराष्ट्रात निधीची कमतरता आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या,
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List