Ram Gopal Varma- चेक बाउन्स प्रकरणात राम गोपाल वर्मांना मोठा झटका, न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट केले जारी
चेक बाउन्स प्रकरणात ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना मुंबईतील न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. राम गोपाल वर्माची तुरुंगवासाची शिक्षा स्थगित करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आणि राम गोपाल वर्मांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी केले. यापूर्वी 21 जानेवारीला राम गोपाल वर्मा यांना न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती तसेच दंडही ठोठावण्यात आला होता.
जानेवारीमध्ये, अंधेरीच्या न्यायिक दंडाधिकारी यांनी राम गोपाल वर्मा यांना तीन महिने तुरुंगवास आणि 3 लाख 72 हजार 219 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाकडून तुरुंगवासाची शिक्षा मिळाल्यानंतर, राम गोपाल वर्मा यांनी न्यायालयात धाव घेतली आणि त्यांची शिक्षा स्थगित करण्यासाठी अपील केले.
4 मार्चला राम गोपाल वर्मा न्यायालयात हजर न राहिल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.ए. कुलकर्णी यांनी त्यांची याचिका फेटाळून लावली. तसेच वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी खटला 28 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आला आहे. असे असले तरीही, न्यायाधीशांनी सांगितले की आरोपीला न्यायालयात हजर झाल्यानंतर जामीन अर्ज दाखल करण्याचे स्वातंत्र्य आहे.
2018 मध्ये एका कंपनीने राम गोपाल वर्मा यांच्याविरुद्ध चेक बाउन्स प्रकरणात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार कंपनीच्या वतीने वकील राजेश कुमार पटेल यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून राम गोपाल वर्मा यांना हार्ड डिस्क पुरवत आहे.
आरोप असा होता की कंपनीने फेब्रुवारी 2018 ते मार्च 2018 पर्यंत राम गोपाल वर्मा यांच्या फर्मला हार्ड डिस्क पुरवल्या होत्या, त्या आधारावर त्यांना 2 लाख 38 हजार 220 रुपये देण्यात येणार होते. या प्रकरणात, आरोपी राम गोपाल वर्मा यांनी 1 जून 2018 रोजी एक चेक जारी केला होता. परंतु पुरेशा निधीअभावी तो बाउन्स झाला. राम गोपाल वर्माच्या फर्मला या प्रकरणाची माहिती देण्यात आली तेव्हा त्यांनी पुन्हा चेक दिला, परंतु तो पुन्हा स्वीकारला गेला नाही. यानंतर कंपनीकडून राम गोपाल वर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List