शेतकरी विरोधी, विसंवादी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार;अंबादास दानवेंनी दिली माहिती

शेतकरी विरोधी, विसंवादी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार;अंबादास दानवेंनी दिली माहिती

सरकार हे शेतकरी विरोधी असून तीन बाजूला तीन तोंड असणारे हे विसंवादी सरकार असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. सरकार जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावत नसल्यामुळे आणि सत्ताधारी पक्ष सातत्याने विरोधी पक्षाला सापत्निकतेची वागणूक देत असल्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या कार्यकाळात झालेले घोटाळे, अत्याचाराच्या घटना, राज्यातील जनतेची सरकारकडून होत असलेली फसवणूक यावर ताशेरे ओढले. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, प्रतोद व आमदार सुनील प्रभू, आमदार भास्कर जाधव, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ उपनेते अमीन पटेल, आमदार भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक उपस्थित होते.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आढळून आले तरी त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. स्वारगेट एसटी बस डेपोतील तरुणीवर बलात्काराच्या घटनेवर निषेध करण्याऐवजी गृहमंत्र्यांनी असंवेदनशील वक्तव्य केलं असून अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याचे दानवे म्हणाले. बीड प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी सेवा दिली जाते. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असताना 7 हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे, सरकार यावर कोणतीही भूमिका घेत नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने उलटूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला सरकार संरक्षण देतेय. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचे अवमान करण्याची केलेली परंपरा आजही सुरू असून हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत, यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पांघरून घालण्याचं काम हे सरकार करत असल्याबाबत दानवे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

वाहनांच्या नवीन प्लेट नंबरसाठी इतर राज्यांच्या तुलनेत आकारण्यात येत असलेले जादा शुल्क, कृषी विभागात बदल्यांसाठी झालेला भ्रष्टाचार, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाला परत आणण्यासाठी सरकारने दाखवलेली तत्परता, लाडकी बहीण योजनेत सुरू असलेली कपात, लाडक्या भाऊ योजनेतील लाभार्थ्यांनाही पैसे न मिळणे यावरून दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र डागले. सोयाबीनच्या उत्पादनापेक्षा नाफेडने संथगतीने खरेदी केली असून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफीची घोषणा व सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी त्यावरून घुमजाव केलं, असेही दानवे म्हणाले.

रस्ते, पाणी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणीतही या सरकारच्या काळात घोटाळा झाला आहे. मंत्रिमंडळात कोणी दोषी असेल तर त्यावर कारवाई करा, आम्ही साथ देऊ असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले. सरकारने केंद्रात संमतीसाठी पाठविलेला शक्ती कायदा राष्ट्रपती यांनी परत पाठवला हे सरकारच अपयश आहे. तीन पक्षात पालकमंत्री नंतर मालक मंत्री कोण यावर वाद आहे मात्र आमच्यात महाराष्ट्राच्या हितासाठी वाद आहे. एकप्रकारे सत्ताधाऱ्यांच स्वार्थी राजकारण सुरू आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

जलजीवन मिशन योजनेतील 40 टक्केच काम पूर्ण झाले असून यातील निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. सरकारचा हा अर्थ नसलेला अर्थसंकल्प अधिवेशन आहे. केलेल्या तरतुदी, दिलेला निधी व झालेला खर्च यांची सांगड घातल्यास हा डोबल अर्थसंकल्प असणार आहे. गेल्यावेळी ज्याप्रमाणे आकडेवारी फिरवून सांगण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न यंदाही होईल. या सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली असून प्रथा व परंपरा यात विसंवाद असल्याची टीका कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केली.

विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात संवाद नाही हे राजकीयदृष्ट्या लोकशाहीला बाधक आहे. ही स्थिती राज्याला शोभणारी नाही. सत्ताधारी व विरोधक यांच्यातील परंपरा, संस्कृती लोप पावत चाललेली आहे, जोपर्यंत हा संवाद होत नाही तोपर्यंत चहापाण्यावर बहिष्कार राहील, अशी आमची भूमिका असेल असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Dhanajy Munde News : विधानपरिषदेचं कामकाज संपताच धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कारण काय? Dhanajy Munde News : विधानपरिषदेचं कामकाज संपताच धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कारण काय?
मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. विधानपरिषदेचं कामकाज संपल्यानंतर दोघांची भेट झाली असल्याची माहिती समोर...
State Budget Session 2025 : 6 हजार 585 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
State Budget Session 2025 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी अंबादास दानवेंची आक्रमक भूमिका
Sanjay Raut News : वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे हे सामाजिक कार्यकर्ते, म्हणून.. ; राऊतांची खोचक टीका
कंटेनरमध्ये लपवून घेत जात होतो 25 कोटींची अशी वस्तू, अखेर पोलिसांच्या सापळ्यात सापडला
आर माधवन सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी करतो फ्लर्ट? स्क्रीनशॉट व्हायरल
Govinda : दोन्ही मुलं समोर, तरी सुनिताने सर्वांसमोर जे केलं, गोविंदा लालेलाल