खड्ड्याचा दणका बसताच आपत्कालीन दरवाजा तुटला, धावत्या टीएमटीतून विद्यार्थी रस्त्यावर फेकला गेला
रस्त्यावरील खड्ड्याचा दणका बसताच आपत्कालीन दरवाजा तुटल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी धावत्या टीएमटीतून बाहेर फेकला गेल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे. सुदैवाने यावेळी मागून आलेल्या गाड्यांनी करकचून ब्रेक दाबल्याने या मुलाचा जीव वाचला. मात्र या विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कृष्णा प्रतापसिंग असे जखमी मुलाचे नाव आहे. त्यामुळे टीएमटीच्या भंगार गाड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कृष्णा हा नारपोली येथील रहिवासी असून तो ठाण्यातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. आज सकाळी त्याने कॉलेजला जाण्यासाठी नारपोली येथून 7.50 ची चेंदणी कोळीवाडा बस पकडली. ही बस अंजूरफाटा येथील रेल्वे पुलाजवळ पोहोचली असता तेथे बसला खड्ड्याचा जोरदार दणका बसला. खड्यामुळे बसलेल्या हादऱ्याने बसचा आपत्कालीन दरवाजा तुटला. दरम्यान बसमध्ये चाकरमानी आणि प्रवाशांची गर्दी असल्याने आपत्कालीन दरवाजाजवळ उभा असलेला कृष्णा थेट चालत्या बसमधून खाली कोसळला.
शिवसैनिक बनले देवदूत
सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पूर्णा जिल्हा परिषद सचिव संदीप पाटील, जगदीश पाटील व शिवाजी भोईर यांनी हा संपूर्ण प्रकार पाहिला. त्यांनी तातडीने धाव घेत या विद्यार्थ्याला शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर कृष्णाच्या पालकांनी त्याला ठाण्यातील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List