मोहन भागवत प्रयागराजला गेले असते तर आम्हीही जाणार होतो पण काहीतरी गडबड… संजय राऊत यांचा खोचक टोला
आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांना फॉलो करतो, ते प्रयागराजला गेले नाही म्हणून आम्हीही गेलो नाही, असा खोचक टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी टीकाकारांना लगावला.
”सरसंघचालक मोहनराव भागवत प्रयागराजला गेले होते का? आम्ही त्यांना फॉलो करतो. मोहन भागवतांना मी तरी प्रयागराजला जाऊन गंगेत डुबकी मारून स्नान करताना पाहिलेले नाही. ते गेले असते तर आम्ही गेलो असतो. आम्ही त्यांना फॉलो करू असे ठरवले होते. भाजपचे मूळ प्रमुख गेले असते तर आमचं जाण्याचं ठरलं होतं. संघाचे इतर प्रमुख नेत्यापैकीही कुणीही दिसलं नाही जाताना. म्हटलं काय गडबड आहे. संघाचं कुणीच जाताना दिसले नाही. म्हणून आम्हीही गेलो नाही. पण तरीही आमच्यातले काही जण जाऊन गंगेत स्नान करून आले. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद असेल किंवा मग नकली हिंदुत्ववादी असलेला सध्याचा भाजपचा पक्ष असेल किंवा त्यांच्यासोबत गेले शिंदे मिंधे जे ते ड्युप्लिकेट आहेत. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असे संजय राऊत म्हणाले.
यावेळी मिंधे गटावर टीका करताना संजय राऊत यांनी त्यांना नकली अघोरी म्हटले आहे. ”मिंध्यांची मती भ्रष्ट झाली आहे. हे नकली अघोरी साधू आहेत. प्रयागराजचे जे अघोरी आहेत त्यांची कित्येक वर्षांची तपस्या आहेत. हे राजकारणातले नकली अघोरी आहेत. हे जे अघोरी कृत्य करतायत, राजकारणात जे पापं करतायत त्यांच्यामुळे गंगेच्या किनाऱ्यावर बसलेल्या अघोरींचं नाव खराब होतंय, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List