महापालिकेच्या पैशांची अफरातफर – डॉ. अनिल बोरगेसह दोघांना अटक; पाच दिवसांची कोठडी
सरकारी तिजोरीतला पैसा स्वतःच्या बँक खात्यात वळविण्याची शक्कल लढवणाऱ्या अहिल्यानगर महापालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आणि विजय रणदिवे यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर दोघांना पहिले नगरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. शेट्टी यांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अहिल्यानगर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी काल दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये डॉ. अनिल बोरगे आणि विजय रणदिवे यांच्याविरोधात गुन्हा दाखाल करण्यात आला होता. रात्री उशिरा दोघांना पोलिसांनी अटक केली होती. आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दोघांना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीने वकील अमित यादव यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. सदर गुन्ह्यातील आरोपी रणदिवे याने केंद्र शासनाचा 15 व्या वित्त आयोगाचा आलेला निधी हा आरोपी डॉ. बोरगे यांच्याशी संगनमत करून वैयक्तिक बँक खात्यात जमा करून पैशाची विल्हेवाट लावली आहे.
यापूर्वी यातील अटक आरोपींनी 7फेब्रुवारी 2023 रोजी केंद्र शासनाचा 15 लाख रुपये निधी परस्पर वैयक्तिक अकाऊंटवर घेतला होता. परंतु सदरचे प्रकरण हे उघडकीस आल्यानंतर सदरचा निधी पुन्हा शासनास परत केला आहे. परंतु त्यानंतर 9 फेब्रुवारी 2023 रोजी 16 लाख 50 हजार रुपयांच्या निधीचा अपहार केला आहे. यातील अटक आरोपी यांनी त्यांच्या नियुक्तीच्या काळामध्ये पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून अशाप्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत काय, याबाबत विचारपूस करून सदरची प्रकरणे उघडकीस आणणे आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकील यादव यांनी न्यायालयासमोर केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर दोन्ही आरोपींना पाच दिवसांची सुनावली आहे.
कोतवाली पोलीस करणार कसून तपास
नगरकरांच्या माध्यमातून जमा होणाऱ्या संकलित करामुळे राज्य शासनाकडून अहिल्यानगर महापालिकेला दरवर्षी मोठा निधी दिला जातो. आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा आदी विभागांसाठी हा निधी देण्यात येतो. मात्र, आलेला निधी स्वतःच्या मालकीचा असल्याच्या थाटात अहिल्यानगर महापालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी वैयक्तिक बँक खात्यात वर्ग केला होता. विजय रणदिवे आणि डॉ. बोरगे यांनी लढवलेली शक्कल नक्की कशी होती, याचा तपास कोतवाली पोलीस आता करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List