पिण्यासाठी पाणी नाही; घाणीचे साम्राज्य, अपुरे सुरक्षारक्षक; जेजुरी एसटी बसस्थानकावरील गैरसोयीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल

पिण्यासाठी पाणी नाही; घाणीचे साम्राज्य, अपुरे सुरक्षारक्षक; जेजुरी एसटी बसस्थानकावरील गैरसोयीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल

प्रवाशांना बसण्यासाठी अपुरी जागा, पुरेशा सावलीचा अभाव, पिण्यासाठी पाणी नाही, पत्र्याच्या शेडमधील घाणीच्या साम्राज्यात अडकलेले स्वच्छतागृह अशी अवस्था आहे, साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र जेजुरी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाची. पुण्याच्या स्वारगेट एसटी स्थानकावर एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेमुळे एसटी स्थानकांवरील सुरक्षा आणि सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जेजुरी बसस्थानकावर फलटण, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, आटपाडी, बारामती आदी काही ठिकाणी गाड्या जातात, तर कुलदैवत खंडोबाच्या दर्शनासाठी पुणे, मुंबई, नाशिक व राज्याच्या विविध भागातून दररोज मोठ्या प्रमाणात भाविक एसटीने येथे येत असतात. येथून 200 गाड्या रोज ये-जा करतात. या ठिकाणी शासनातर्फे साडेचार कोटी रुपये खर्चुन भव्य बसस्थानक बांधण्याचे काम सुरू आहे. आठ महिन्यांपासून बांधकाम सुरू झाल्याने फक्त 40 टक्के जागा सध्या स्थानकासाठी वापरली जात आहे. सर्वत्र लोखंडी पत्रे लावून हा भाग बंदिस्त केला असून, तात्पुरती तीन शेड बसविण्यात आली आहेत. यामध्ये फक्त 40 ते 45 माणसे बसू शकतात. लोखंडी पत्र्याची तात्पुरती शेड असल्याने आत बसल्यावर उन्हामुळे प्रचंड गरम होते. कडक ऊन असल्याने सावलीअभावी प्रवाशांना चक्कर येण्याचे प्रकार घडले आहेत.

या परिसरात दगड-मातीचे साम्राज्य असल्याने गाड्या आत शिरताना प्रचंड धुराळा उडतो. रविवारी येथे प्रचंड गर्दी असते. पुण्याला जाणाऱ्या जादा गाड्या मागवाव्या लागतात. येथे पत्र्याचे स्वच्छतागृह केलेले असून ते घाणीच्या साम्राज्यात अडकल्याने त्याचा वापर प्रवासी करण्याचे टाळतात. बसस्थानकाच्या परिसरात अनेक जण लघुशंका करताना दिसतात. येथे दिवसा सुरक्षारक्षक नाही. येथून 700 विद्यार्थ्यांचे पास आहेत.

विशेष म्हणजे हे बसस्थानक आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला आहे. या ठिकाणी जेजुरी बसस्थानकाचा कोणताही मोठा फलक लावलेला नाही. गाड्या बाहेर पडताना अपघाताची शक्यता आहे. बसस्थानकाचे काम सुरू आहे. ते पूर्ण होण्यासाठी एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकेल, त्यामुळे इतके दिवस प्रवाशांचे हाल होणार का, असा संतप्त सवाल प्रवासी करीत आहेत. येथील परिसराचे डांबरीकरण करावे, प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी जागा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी जेजुरी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.

जेजुरी हे तीर्थक्षेत्र असून येथे दररोज हजारो भाविक एसटीने देवाच्या दर्शनासाठी येत असतात, मात्र एसटी महामंडळाने भाविक व जेजुरीकर ग्रामस्थांना वाऱ्यावर सोडले आहे. नवीन बसस्थानक बांधण्याच्या नावाखाली प्रवाशांचे हाल सुरू केले आहेत. जेजुरी बसस्थानकामध्ये तातडीने प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून न दिल्यास जेजुरीकर ग्रामस्थांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख किरण दावलकर यांनी दिला आहे.

बसस्थानकावर फक्त तीनच कर्मचारी

येथील बसस्थानकावर सकाळी 6 ते दुपारी 2 व दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत असे दोन वाहतूक नियंत्रक व रात्री एक सुरक्षारक्षक असे तीनच कर्मचारी आहेत. सुरक्षारक्षकाची ड्युटी रात्री 10 ते सकाळी 6 अशी आहे. दिवस पाळीला एकही सुरक्षारक्षक नाही. रात्री १० वाजेनंतर जेजुरीतून जाणाऱ्या गाड्या बाहेर रस्त्यावरच उभ्या राहतात. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो. प्रवाशांना मार्गदर्शन करणारे फलक कुठेच लावलेले नाहीत. येथे बारामती डेपोच्या फक्त दोन गाड्या मुक्कामी असतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात सरकते जिने, शेलू स्थानकात लिफ्ट, आणखी काय सुविधा ? मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात सरकते जिने, शेलू स्थानकात लिफ्ट, आणखी काय सुविधा ?
पूर्वी केवळ विमानतळ आणि मॉलमध्ये दिसणारे सरकते जिने आता सगळीकडे दिसू लागले आहे. मध्य रेल्वेवर तर सरकते जिने आणि लिफ्टची...
धनंजय मुंडेंचा तर आरोपींना वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न, अंजली दमानिया यांनी पुन्हा तोफ डागली, केली ही मोठी मागणी
12 अफेअर! 2 वर्षात मोडला संसार, 53 वर्षीय अभिनेत्री म्हणते, ‘मी चुकीच्या पुरुषांसोबत…’, आजही ‘ती’ खऱ्या प्रेमाच्या प्रतीक्षेत
राहा कपूरला कोणाचा धोका? आलियाने इंस्टाग्रामवरुन हटवले लेकीचे सर्व फोटो, घेतला मोठा निर्णय?
प्रेग्नेंसीमध्येही शूटींग करतेय कियारा अडवाणी; चेहऱ्यावर दिसतोय ‘आईपणाचा ग्लो’, सेटवरील फोटो व्हायरल
Video: 30 वर्षानंतर राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेची भेट, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
पाच मुख्यमंत्र्यांसोबत काम करणारी एकमेव अभिनेत्री, शेवटची ‘ती’ इच्छा राहिली होती अपूर्ण