शनिदेवाला आता ब्रॅण्डेड तेलाचा अभिषेक, देवस्थानचा निर्णय; 1 मार्चपासून अंमलबजावणी
तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात शनिमूर्तीला आता फक्त ब्रॅण्डेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच अभिषेक करता येणार आहे. शनैश्वर देवस्थान आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्तरीत्या हा निर्णय घेतला असून या निर्णयाची 1 मार्चपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, सुटे व भेसळयुक्त तेलामुळे शनिमूर्तीची भविष्यात होणारी झीज थांबली जाणार असल्याने देवस्थानच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
शनिमहाराजांच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात लाखो भाविक हजेरी लावतात. शनीची इडा-पीडा टळू दे यासाठी भाविक शनिमूर्तीला तेल वाहतात. महिन्याकाठी वीस हजार लिटर, तर वर्षभरात पाच लाख लिटर तेल शनिमूर्तीवर अर्पण केले जाते. यामध्ये 100 ग्रॅमपासून, पाच ते दहा लिटरपर्यंतच्या तेलाचा समावेश असतो. यामध्ये सर्वाधिक 100, 200, 500 मिलीलिटरचा पाऊच अथवा बॉटलने शनिमूर्तीवर तेल अर्पण केले जाते.
शनेश्वर देवस्थानने घेतलेल्या निर्णयानुसार फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच अभिषेक करता येणार आहे. शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत 1 मार्च 2025 पासून फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी खाद्यतेलानेच अभिषेक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती आणि आदेश मंदिर परिसरात असलेल्या व्यावसायिक, दुकानदारांना बजावले आहे. यानुसार सुटे तेल (नियमबाह्य तेल) वापरण्यास बंदी घालण्यात आली असून, शनिमूर्तीला अर्पण करण्यात येणारे तेल आता शुद्ध रिफायनरी केलेले तसेच अन्न व औषध प्रशासनाचा असलेला एफएसएआय तेल आता शनिमूर्तीवर टाकता येणार आहे. या निर्णयाची 1 मार्चपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
ग्रामसभेत ठराव मंजूर
शनेश्वर देवस्थान व ग्रामपंचायतीच्या ग्रामससभेत ठराव मंजूर करण्यात आला आणि देवस्थान समितीने अंतिम मान्यता दिली आहे. शुद्ध तेल वापरण्यावर ग्रामसभा व विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा झाली. ग्रामस्थ, भक्तगण आणि तज्ञ यांच्या मते हा निर्णय आवश्यक आहे. यामुळे शनिदेवाची स्वयंभू मूर्ती सुरक्षित राहील, असे सांगण्यात आले होते.
भाविकांनी सुटय़ा तेलाची बाटली अगर पाऊच आणल्यास अभिषेकास परवानगी मिळणार नाही. तसेच, अशा तेलाबाबत भारतीय अन्नसुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी नमुने पाठवले जातील. जर भाविकांनी नियम मोडले, तर त्यांच्यावर देवस्थानकडून प्रशासनात्मक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. – नितीन शेटे, सहाय्यक अधिकारी, शनिशिंगणापूर देवस्थान
भेसळयुक्त तेलामुळे घेतला निर्णय
शनिमूर्तीला अर्पण करण्यासाठी भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणतात. मात्र अन्न व भेसळ तपासणी अहवालानुसार असे आढळले की, काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे. भेसळीच्या तेलामुळे मूर्तीच्या पृष्ठभागाची झीज वाढत आहे. त्यामुळे देवस्थान समितीने कठोर पावले उचलत फक़्त नामांकित ब्रँडेड तेलच वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List