पर्यटनाची पंढरी असलेल्या पालघरमध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाचे कार्यालयच नाही, 45 वर्षांपूर्वी बांधलेल्या हॉटेल-लॉजिंगचे खंडहर झाले
पर्यटनाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) कार्यालयच उभे राहिलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला मोठी खीळ बसली आहे. एमटीडीसीने जव्हार शहरातील हनुमान पॉइंट येथे 45 वर्षांपूर्वी बांधलेल्या हॉटेल आणि लॉजिंगची कोणतीही देखभाल दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे पर्यटकांसाठी बांधलेली ही वास्तू म्हणजे खंडहर हवेली बनली आहे.
पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना पर्यटकांकडून नेहमीच पसंती दिली जाते. त्यामुळे जिल्ह्यात वर्षभर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या जिल्ह्याकडे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने मात्र कमालीचे दुर्लक्ष केले आहे. या जिल्ह्यात कोठेही पर्यटन विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे पर्यटकांना जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती व्यवस्थितपणे मिळत नाही. परिणामी काही पर्यटनस्थळे हे दुर्लक्षित राहिले आहेत.
उपप्रादेशिक कार्यालय सुरू करा
पालघर जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांची माहिती जर पर्यटकांना मिळाली तर जिल्ह्यात पर्यटन व्यावसायाला चालना मिळणार आहे. मात्र शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी खीळ बसली आहे. जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय विकसित करण्यासाठी शासनाने जिल्ह्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय सुरू करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख प्रफुल्ल पवार यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List