गद्दारीचा डाग लागणार, डीके शिवकुमार काँग्रेसचे एकनाथ शिंदे होणार; भाजपनं तारखेसह केलेल्या दाव्यानं खळबळ
तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आणि भाजपशी हातमिळवणी करत महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांनी केले होते. आता अशीच फोडाफोडी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष कर्नाटकमध्ये करत असल्याचे दिसत आहे.
‘काँग्रेसमध्ये अनेक नेते एकनाथ शिंदे होऊ शकतात आणि डीके शिवकुमार त्यापैकी एक असू शकतात’, असे विधान भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केले आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनीही काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढत असून प्रत्येकजण डीके शिवकुमार यांना टार्गेट करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजप कर्नाटक काँग्रेस फोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.
‘मी याआधीही म्हणालोय की काँग्रेस सरकारमध्ये लवकरच नेतृत्व बदल होईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची जागा डीके शिवकुमार घेतील. 16 नोव्हेंबर 2025 या शुभ मुहूर्तावर हा नेतृत्व बदल होईल’, असे आर. शिवकुमार म्हणाले. तसेच काँग्रेस सरकार पाडण्यात डीके शिवकुमार यांची भूमिका महत्त्वाची असेल असेही ते म्हणाले.
ते पुढे असेही म्हणाले की, ‘डीके शिवकुमार हे प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यात सहभागी झाले होते आणि गंगेत त्यांनी पवित्र स्नानही केले. तसेच शिवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमातही ते सहभागी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत ते तिथे दिसले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करायची अथवा नाही हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे.’
प्रकरण काय?
महाशिवरात्रीनिमित्त कोइंबतूर येथे ईशा फाऊंडेशनतर्फे आयोजित सदगुरूंच्या कार्यक्रमाला कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते. यावरून काँग्रेस नेत्यांनीही डीके शिवकुमार यांच्यावर टीका केली होती.
काँग्रेसची टीका, शिवकुमार यांचं स्पष्टीकरण
एआयसीसीचे सचिव पीव्ही मोहन कुमार यांनी डीके शिवकुमार यांच्यावर निशाणा साधला होता.’ राहुल गांधी यांची खिल्ली उडवणाऱ्या नेत्याचे आमंत्रण स्वीकारून डीके शिवकुमार तिथे गेले’, अशी टीका पीव्ही मोहन कुमार यांनी केली होती. याला डीके शिवकुमार यांनीही प्रत्युत्तर दिले होते. ‘मी हिंदू आहे. हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार. पण माझे सर्व धर्मावर प्रेम आहे आणि मी सर्व धर्मांचा आदरही करतो’, असे डीके शिवकुमार यांनी म्हटले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List