तानाजी यांनी सर केला 1800 फूट कोकणकडा
हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा सर करत महाराष्ट्र रेंजर्स संस्थेच्या गिर्यारोहकांनी त्यांच्या जिद्दीचं दर्शन घडवलं. अहिल्यानगर परिसरातील 1800 फूट उंचीचा हा भव्य असा अत्यंत कठीण श्रेणीत गणला जाणारा कातळकडा नुकताच शिवजयंतीचे औचित्य साधत विक्रमी वेळेत सर करून छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना दिली. या मोहिमेत तानाजी केकरे यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. हरिश्चंद्रगड कोकणकडा हा ठाणे, पुणे आणि अहिल्यानगर जिह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र कडा आहे. अभेद्य असा हा कडा चढाईस अत्यंत कठीण समजला जातो. शिवजयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2025 रोजी कोकणकडा चढाईची आखणी महाराष्ट्र रेंजर्स संस्थेने प्रदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केली. 20 फेब्रुवारी रोजी प्रथम चढाईसाठी गिर्यारोहक तानाजी केकरे तयार झाले व सकाळी 9 वाजता चढाईस सुरुवात केली. मोहिमेकरिता प्रगत उपकरणांचा वापर करण्यात आला. हा इतर कडय़ांसारखा 90 अंशात नसून बाह्यगोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो. पाण्याचे असलेले दुर्भिक्ष, मधमाशांची मोठ-मोठी पोळी, अतिदुर्गम भाग आणि अत्यंत खडतर चढाईमार्ग यामुळे कोकणकडा सर करणे हे गिर्यारोहकांसाठी एक मोठे आव्हान असते. गिर्यारोहक सचिन शिंदे, अखिल सुळके, प्रदीप गायकवाड यांनीही कडय़ाच्या ससाणा लेजपर्यंत चढाई केली. त्यापुढील चढाई तानाजी यांनी एकहाती पूर्ण केली.
महाराष्ट्र रेंजर्सच्या या गिर्यारोहकांनी आतापर्यंत सह्याद्रीतील अनेक दुर्गम व कठीण श्रेणीतील सुळक्यांवर चढाई केलेली असून हिमालयातील मोहिमाही यशस्वीरीत्या पार पाडलेल्या आहेत.
तानाजी केकरे हे गिर्यारोहण क्षेत्रातील एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व असून त्यांनी बेसिक तसेच अॅडव्हान्स रॉक क्लाइंबिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे तसेच सुवर्णपदक संपादन केले आहे. ते आंबेवाडी गावाचे रहिवासी असून एक अनुभवी ट्रेक गाईड म्हणूनदेखील कार्यरत आहेत. याआधी लिंगाणा हा अवघड श्रेणीतील सुळका 11 मिनिटे 22 सेकंदांत, अलंग मदन कुलंग हे दुर्गत्रिपुट 3 तास 12 मिनिटांत तसेच कळसुबाई हे सर्वोच्च शिखर अवघ्या 38 मिनिटे 14 सेकंदांत सर करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. तानाजी यांनी याआधी बाण, नानाचा अंगठा, वजीर, वानरलिंगी, कळकराई, तैलबैला यांसारख्या अत्यंत कठीण अशा सुळक्यांवर यशस्वीरीत्या चढाई केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List