फिरत्या चाकांवर रंगणार साहित्ययात्री संमेलन, विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी मराठी साहित्ययात्री संमेलन होणार आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच संमेलन असेल.
साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱया रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत. मराठी भाषामंत्री उदय सामंत स्वागताध्यक्ष असून तेही सहभागी होत रेल्वेतून प्रवास करणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती सरहद, पुणेचे विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लेखक शरद तांदळे यांची संमेलनाध्यक्ष, तर लेखक वैभव वाघ हे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. डॉ. शरद गोरे (कार्याध्यक्ष), सचिन जामगे, (कार्यवाह), अॅड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे (मुख्य समन्वयक), अक्षय बिक्कड, सागर काकडे (निमंत्रक) यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.
n सरहद, पुणेचे अध्यक्ष संजय नहार, शरद तांदळे, वैभव वाघ, शरद गोरे उपस्थित होते. 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, तालकटोरा स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. या संमेलनात सहभागी होणाऱया साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली अशी विशेष रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही विशेष रेल्वे 19 फेब्रुवारी रोजी दुपारी पुण्यातून निघणार असून 20 फेब्रुवारी रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे.
n विशेष रेल्वेला 16 बोगी असणार असून प्रवासादरम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. याच रेल्वे प्रवासात 1200 पेक्षा अधिक साहित्यिक येणार असून, पुस्तक-जळगाव आणि ग्वाल्हेर येथे ही विशेष रेल्वे पोहोचल्यानंतर ग्वाल्हेर येथील स्थानिक नागरिक भव्य स्वागत करणार आहेत. परतीच्या प्रवासातदेखील हे संमेलन रंगणार असून 25 रोजी पुणे रेल्वे स्थानकावर या अनोख्या संमेलनाची सांगता होईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List