त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाविरोधात पुरातत्त्व विभागाचा इशारा
महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाच्या अडचणीत वाढ झाली आहे. या कार्यक्रमाविरोधात माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवल्यानंतर आता पुरातत्त्व विभागाने (ASI) त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र पाठवलं आहे. मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमावर एएसआयनं आक्षेप नोंदवला आहे. महाशिवरात्रीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणं हे एएमएएसआर कायद्यानुसार नियमबाह्य असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे कार्यक्रमांपूर्वी एएसआय दिल्लीकडून परवानगी घेण्याचे आदेश त्यांनी देवस्थानला दिले आहेत.
माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता. मंदिरात गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा इशारा एएसआयने दिला होता. त्याचप्रमाणे मंदिरातील व्हीआयपी दर्शनासाठी उत्तरेकडील गेटवर 200 रुपये शुल्क घेतल्याचाही प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारे प्रवेश शुल्क घेणं हे एएमएएसआर कायद्याचं उल्लंघन असल्याचं एएसआयनं म्हटलं आहे. याबाबत देवस्थान ट्रस्टने तातडीने सुधारात्मक उपाययोजना कराव्यात अशी सूचना पुरातत्व विभागाने दिली आहे. त्याचप्रमाणे संबंधित प्रकरणावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्याबाबत दिल्ली आणि मुंबई एएसआय अधिकाऱ्यांना कळवलं आहे.
माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटलंय, “यापूर्वी सेलिब्रिटींच्या कार्यक्रमाची मंदिरात परंपरा नाही. महाशिवरात्रीला सेलिब्रिटींच्या कार्यक्रमाने चुकीचा पायंडा पाडू नये. महाशिवरात्रीला संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात प्राजक्ताचा ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र या कार्यक्रमामुळे मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये.” यावर अद्याप मंदिर विश्वस्तांकडून किंवा प्राजक्ताकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होते. यादिवशी मंदिर विश्वस्तांकडून कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. यंदा शिवस्तुती नृत्याविष्काराचा कार्यक्रम मंदिर विश्वस्तांकडून आयोजित करण्यात आला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या नृत्यकौशल्यासाठी ओळखली जाते. याआधी तिने श्री श्री रवीशंकर यांच्या बेंगळुरू इथल्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन’च्या आश्रमातही लावणी सादर केली होती. शास्त्रीय- उपशास्त्रीय नृत्य संगीताच्या मेळाव्यात प्राजक्ताला गुरुंसमोर लावणी सादर करण्याची संधी मिळाली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List