सासरी, माहेरी जाताय? आधी टाईमटेबल पहा, मगच बाहेर पडा, रेल्वेचा ब्लॉक कुठे ?
रविवार.. हा सुट्टीचा दिवस असला तरी कामानिमित्त, तर कधी फिरायला जाण्यासाठी किंवा कुटुंबियांची भेट घेण्यासाठी असंख्य मुंबईकर बाहेर पडत असतात. कार किंवा रिक्षाने जाऊन ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा अनेक जण रेल्वेना स्वस्त आणि मस्त, मुख्यत: वेगाने प्रवास करणं प्रेफर करतात. सुट्टी पाहून, मुंबईकरांनी तुम्ही देखील बाहेर पडण्याचा आणि रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर एक मिनिट थांबा. कारण मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या रेल्वेचा मेगा ब्लॉक असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी केवळ मध्यच नव्हे तर पश्चिम आणि हार्बर मार्गावरही ब्लॉक असेल. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक ?
मध्य रेल्वेवरील अंबरनाथ ते वांगणीदरम्यान आणि पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरिन लाईन्स दरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे रात्रीच्या वेळी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
अंबरनाथ ते वांगणीदरम्यान पादचारी पुलाच्या कामानिमित्त शनिवारी रात्री 1.30 ते रात्री 3 वाजेपर्यत अप आणि डाऊन मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे कोणार्क एक्सप्रेस कर्जत-पनवेल मार्गे वळवली जाईल आणि पनवेल येथे थांबवण्यात येईल. तर, रात्री 11.13 वाजताची परळ-अंबरनाथ लोकल बदलापूर स्थानकापर्यंत चालवण्यात येईल.
रात्री 11.51 वाजताची सीएसएमटी ते बदलापूर लोकल अंबरनाथपर्यंत चालवण्यात येईल. तर रात्री 12.12 वाजताची सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. रात्री 2 वाजून 30 मिनिटांची कर्जत-सीएसएमटी लोकल कर्जतऐवजी अंबरनाथ स्थानकावरून सुटेल.
रविवारचं वेळापत्रक कसं असेल ?
मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 या वेळेत ब्लॉक असेल. यादरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद आणि अर्ध जलद लोकल गाड्या ठाणे ते कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत, त्यामुळे त्या कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. याचप्रमाणे, कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद आणि अर्ध जलद लोकल गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान धीम्या मार्गावर धावतील आणि नंतर मुलुंड स्थानकापासून पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर कशी असेल परिस्थिती ?
तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान उद्या जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. हा ब्लॉक सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 या वेळेत घेतला जाणार आहे. या कालावधीत या मार्गावरील सर्व जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावरून धावतील. त्याशिवाय, काही अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तसेच बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान धावणाऱ्या काही लोकल गाड्या गोरेगावपर्यंतच चालवल्या जातील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List