‘आता मी धक्का पुरुष झालोय त्यामुळे…’ उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं आहे. ते कुर्ला, कलिना येथील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. विभागक्रमांक 6 च्या विभागप्रमुखपदी सोमनाथ सापळे यांची नियुक्ती झाल्यानंतर पदाधिकारी भेटायला गेलेले असताना त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आता मी धक्का पुरुष झालो आहे, असे कोण किती धक्के देतंय ते बघुयात. यांना काय धक्के द्यायचे ते आता देऊद्यात. पण आपण एकच धक्का असा देऊ की हे पुन्हा दिसणार नाहीत. जपानमध्ये भूकंपाचे धक्के बसले नाहीत तर आश्चर्य व्यक्त केल जात, तसं आता उद्धव ठाकरे यांना धक्का बसला नाही तर आश्चर्य व्यक्त केलं जातं. कोण किती धक्के देतंय ते बघू, पण आपण एकच धक्का असा देऊ की हे पुन्हा दिसणार नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. एकादा निर्णय घेतल्यावर नाराजी असतेच, सैनिक म्हंटल्यावर शिस्त असली पाहिजे. ही लढाई एकट्या-दुकट्याची नाही तर ही लढाई आपली आहे. आपल्या मुळावर घाव घालण्यासाठी ते सरसावले आहेत. आपल्याच लाकडाचा दांडा करून कुदळ करून शिवसेना आणि मराठी माणसाच्या मुळावर घाव घालण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आता आपण एकत्र राहिलं पाहिजे.
संघटनात्मक बांधणी करण्याचे हे दिवस आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल मे मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता दिलेली कामं सर्वांनी करा. शाखेनुसार कामाला लागा. विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता आता ती चूक पुन्हा होणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List