अमित ठाकरे यांचं अजितदादांना पहिल्यांदाच जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, निवडणूक हरलो तरी…
लोकसभेत आमचा पराभव झाला. एकच जागा निवडून आली. आम्ही काही बोललो नाही. आम्ही काम करत राहिलो. विधानसभेत त्याचं फळ मिळालं. जनतेने आम्हाला निवडून दिलं. तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता? असा जोरदार हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला होता. अजितदादा यांच्या या टीकेला मनसे नेते अमित ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मला माझ्या पहिल्या नव्हे तर शेवटच्या निवडणुकीत जज करा, असा टोला अमित ठाकरे यांनी अजितदादांना लगावला आहे.
कामगार नगर प्रीमियर लीग – 2025″ स्पर्धेचे आयोजन दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर करण्यात आलं होतं. स्व. श्रीकांतजी ठाकरे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. मनसे नेते अमित ठाकरे यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी अजितदादांच्या टीकेचा समाचार घेतला. अजितदादांना प्रत्युत्तर द्यायला मी अजून खूप लहान आहे. राज ठाकरेच त्यांना उत्तर देतील. पण एक सांगतो, निवडणुकीत हरलो असलो तरी खचलो नाही. या निवडणुकीत खूप काही शिकलो. मला इतर गोष्टीचा फरक पडत नाही. माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर शेवटच्या निवडणुकीत मला जज करा, असा टोला अमित ठाकरे यांनी अजितदादांना लगावला आहे.
तर हेच निकाल दिसतील
अमित यांनी यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीवरही भाष्य केलं. 2017मध्ये राज ठाकरे सर्वच नेत्यांना भेटले होते. त्यांनी सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांनाही सांगितलं होतं की, तुमचा ईव्हीएमवर विश्वास नसेल तर बहिष्कार टाका. ईव्हीएम आलं म्हणजे प्रोग्रामिंग आलं आणि त्यामध्ये तुम्ही काहीही फसवणूक करू शकता. या निवडणुकीत नाहीतर पुढच्या निवडणुकीत होईल ही आशा आहे. बॅलेट पेपर हे बेटर आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. आम्ही याच मतांवर ठाम आहोत. निवडणुकांवर बहिष्कार टाकायचा नसेल तर हेच रिझल्ट तुम्हाला दिसतील, असं अमित ठाकरे म्हणाले. ईव्हीएमवर किती विश्वास आहे माहिती नाही. माझ्याकडे पुरावा नाही. राज ठाकरे याच्यावर स्पष्ट बोलतील. निकाल जो येतोय, तो अनपेक्षित असाच आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मार्चपासून दौरा करणार
महापालिका निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. महापालिका निवडणुकीची आमची तयारी सुरू आहे. मार्चपासून मी दौरे करणार आहे. त्याचा अहवाल राज ठाकरे यांना देणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये नक्कीच बदल होईल. बदल होण्याची गरज आहे. मी आत्मपरीक्षण करत होतो. तेव्हा काय चुका झाल्या हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मी तसा अहवाल राज ठाकरे यांना देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे राजकारणातील कोहली, शर्मा
मनसे हा ग्राऊंड लेव्हलचाच पक्ष राहणार आहे. कुठेही एखादा विषय सुटला नाही तर तो राज साहेबांकडे येतो आणि तो विषय मार्गी लागतो. प्रत्येक पक्षाला यश हवं असतं. आमच्याही आयुष्यात ते आलं. आम्हीही सत्तेत बसू. राज ठाकरे हे राजकारणातील विराट कोहली आणि रोहित शर्मा आहेत. इतकच नाही तर सचिन तेंडुलकर यांच्यासारखं कोणता बॉल कसा घ्यायचा हे त्यांना माहीत आहे. मीही त्यांच्याकडूनच शिकतोय, असंही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List