जणू माझ्या भावाचाच अतोनात छळ..; ‘छावा’च्या क्लायमॅक्सबद्दल बोलताना अभिनेता भावूक
विका कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई सुरू आहे. प्रदर्शनाच्या आठवडाभरातच या चित्रपटाने कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटातील अनेक सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी क्लायमॅक्सचा सीन पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत. थिएटरमधून पाणावलेल्या डोळ्यांनी प्रेक्षक बाहेर पडतान दिसत आहेत. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची तर विनीत कुमार सिंहने छत्रपती संभाजी महाराजांचे कवी मित्र छंदोगामात्य ऊर्फ कवी कलश यांची भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विनीत क्लायमॅक्सच्या शूटिंगचा अनुभव सांगितला.
आपल्याच माणसांच्या गद्दारीमुळे छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडतात. त्यानंतर औरंगजेब त्यांचा अतोनात छळ करतात. यावेळी कवी कलशसुद्धा त्यांच्यासोबत असतात. विकी कौशल आणि विनीत कुमार यांच्यातील कवितेचा सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सीनच्या शूटिंगबद्दल विनीत म्हणाला, “आम्ही बऱ्याच काळापासून त्या सीनची प्रतीक्षा करत होतो. कारण शूटिंगच्या शेडयुलमध्ये तो सर्वांत शेवटी होता. जेव्हा आम्ही त्या सीनसाठी शूटिंग करत होतो, तेव्हा आमच्या काही आशा होत्या. विकीबद्दल माझ्या मनात हळवा कोपरा आधीपासूनच होता, कारण माझ्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाच्या वेळी तो सहाय्यक दिग्दर्शकाचं काम करत होता. तेव्हापासून आमच्याचं चांगलं नातं आहे. आमच्यात काही साम्यसुद्धा आहे. विकी इंजीनिअर तर मी डॉक्टर आहे. छावा या चित्रपटातील भूमिका आमच्या नशिबातच होत्या असं आम्हाला कुठेतरी वाटतं.”
“त्या सीनसाठी शूटिंग सुरू होण्याआधी मी विकीकडे बघायचो. त्याच्या जागी जणू माझा भाऊच तिथे उभा आहे आणि माझ्या प्रिय भावालाच ते अतोनात त्रास देत आहेत अशी भावना माझ्या मनात यायची. माझ्या भावासाठी मी काहीही त्याग करण्यासाठी तयार आहे. मला असं वाटलं की त्यांनी माझ्या भावाचाच छळ केला आहे. पण त्यांच्यासमोर मी झुकू शकत नाही. कारण छत्रपती संभाजी महाराजांना हा अभिमान होता की औरंगजेब काहीही करू शकतो पण त्यांच्या आत्म्याला तोडू शकत नाही. या विचारानंतर मी पाच सेकंदात त्या भूमिकेत शिरलो. त्यानंतर संपूर्ण रात्रभर त्या दृश्याचं शूटिंग चाललं होतं”, अशा शब्दांत विनीतने अनुभव सांगितला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List