महाराष्ट्राचं मीठ खाल्लंय..; हक्काच्या घराबाबत ‘छावा’च्या अभिनेत्याचं भावूक उत्तर
प्रदर्शनाच्या अवघ्या आठवडाभरातच ‘छावा’ या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जितकी चर्चा यातील मुख्य कलाकारांची होतेय, तितकीच चर्चा या चित्रपटातील सहाय्यक कलाकारांचीही होतेय. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे कवी मित्र छंदोगामात्य (कवी कलश) यांची भूमिका साकारणारा अभिनेता विनीत कुमार सिंह सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. आपल्या दमदार अभिनयकौशल्याने त्याने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. अशातच विनीतच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ चर्चेत आला होता. त्यात तो करिअरमधील संघर्षाबद्दल बोलताना भावूक झाला होता. “या इंडस्ट्रीत मला 23 वर्षे झाली, पण अजूनही मी मुंबईत हक्काचं घर घेऊ शकलो नाही”, असं तो म्हणाला होता. आता ‘छावा’ला मिळालेल्या यशानंतर त्याने स्वत:चं घर विकत घ्यावं, अशी इच्छा नेटकरी व्यक्त करत आहेत. त्यावर विनीतनेही मनाला स्पर्श करणारं उत्तर दिलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी विनीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यापूर्वा तुळापूर इथं भेट दिल्याचा त्याचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातच एका युजरने घर घेण्याबद्दल कमेंट केली. ‘भावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने तुझं मुंबईत लवकरच हक्काचं घर होईल. पुढच्या शिवजयंतीला तुझ्या मुंबईतील स्वत:च्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असेल’, असं संबंधित युजरने लिहिलं. त्यावर विनीतने उत्तर देत म्हटलंय, ‘महाराष्ट्राचं मी खूप मीठ खाल्लंय. महादेव, आई भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने जे होईल ते मला स्वीकार असेल. तुम्हा सर्वांच्या प्रेमळ संदेशासाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. हर हर महादेव!’
दुसरीकडे एक्स अकाऊंटवरही एका युजरने लिहिलं, ‘आता भावा मुंबईत स्वत:चं घर घे. तुझी प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.’ त्यालाही विनीतने ‘हर हर महादेव, धन्यवाद’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. विनीतचं घर घेण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं, अशी चाहत्यांची इच्छा आहे.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत विनीत म्हणाला होता, “मला या शहरात (मुंबई) 23 वर्षे झाली, पण आजसुद्धा इथे माझं हक्काचं घर नाही. ही खूप अजब गोष्ट आहे. इतकं काम करतोय, सगळं काही आहे, पण माझं स्वत:चं घर मी विकत घेऊ शकलो नाही. ज्यावेळी मी ‘धोखा’ या चित्रपटात काम करत होतो, तेव्हा आलिया भट्ट ही महेश भट्ट सरांच्या कुशीत बसायची, इतकी लहान होती. त्यावेळीही मी संघर्ष करत होतो आणि आजसुद्धा मी संघर्षच करतोय. आलिया ही खूप प्रतिभावान अभिनेत्री आहे.”
“लोकं म्हणतात की सोनं आगीत तळपूनच चमकतो. पण सोनं सतत तळपतच असेल तर ते काय कामाचं? त्याला कोण परिधान करणार? माझा खूप सारा वेळ हा तळपण्यातच निघून गेला (कंठ दाटून येतो). सर्वजण म्हणतात की संघर्ष गरजेचा असतो. मी कुठे म्हणतोय की मला संघर्षापासून पळायचं आहे. पण किती? मी काय मागतोय? मला फक्त चांगलं काम करायचं आहे, चांगल्या चित्रपटांचा मला भाग बनायचं आहे, चांगल्या दिग्दर्शकांसोबत आणि निर्मात्यांसोबत मला काम करायचं आहे. मी माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे करतोय”, असं म्हणताना विनीतचा कंठ दाटून येतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List