पुरुष तर लग्न..; मुलगा प्रतीकच्या दुसऱ्या लग्नाबद्दल राज बब्बर यांची खोचक प्रतिक्रिया
अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरने नुकतंच लग्न केलं. गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी त्याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मुंबईत स्मिता पाटील यांच्या निवासस्थानीच हा लग्नसोहळा पार पडला. मात्र या लग्नाला प्रतीकने त्याच्या कुटुंबीयांना बोलावलंच नव्हतं. खुद्द वडील राज बब्बर यांनासुद्धा लग्नाचं आमंत्रण नव्हतं, असा खुलासा प्रतीकचा सावत्र भाऊ आर्य बब्बरने एका मुलाखतीत केला. यावरून आता आर्यने त्याच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये विनोद केला आहे. इतकंच नव्हे तर मुलाने लग्नाला न बोलवण्याबद्दल राज बब्बर यांची प्रतिक्रिया काय होती, तेसुद्धा त्याने उपरोधिक अंदाजात सांगितलं आहे.
‘बब्बर तो शादी करते रहते है’ (बब्बर तर लग्न करतच असतात) असं शीर्षक या स्टँडअप कॉमेडी व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये आर्य म्हणतो, “मी सहमत आहे की माझ्या वडिलांनी दोन वेळा लग्न केलं, माझ्या बहिणीचंही दोनदा लग्न झालं आणि आता माझ्या भावानेही दुसऱ्यांदा लग्न केलंय. इतकंय काय तर माझा पाळीव श्वान हॅपी याचेही दोन गर्लफ्रेंड्स आहेत. त्यामुळे मला दुसऱ्यांदा लग्न करण्याबद्दल काही हरकत नाही. पण घटस्फोटाच्या गुंतागुंतीतून जाण्यासाठी मी खूप आळशी आहे.”
प्रतीक बब्बरच्या लग्नाला न गेल्याबद्दल जेव्हा मीडियाकडून प्रश्न विचारले जातील, तेव्हा काय उत्तर द्यायचं असा प्रश्न तो वडील राज बब्बर यांना विचारतो. त्यावर त्यांनी दिलेलं उपरोधिक उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. तो म्हणतो, “आपण प्रतीकच्या लग्नाला का गेलो नाही, असा प्रश्न विचारल्यावर काय उत्तर द्यायचं? असा प्रश्न मी वडिलांना विचारला. त्यावर ते म्हणाले, त्यांना सांग की ‘मर्द तो शादी करते रहते है’ (पुरुष हे लग्न करतच असतात).”
राज बब्बर यांनी नादिरा बब्बर यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. या लग्नातून त्यांना आर्य हा मुलगा आणि जुही ही मुलगी आहे. त्यानंतर 1983 मध्ये त्यांनी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशी दुसरं लग्न केलं. स्मिता आणि राज यांना प्रतीक हा मुलगा आहे. मात्र बाळाच्या जन्मानंतर स्मिता पाटील यांचं निधन झालं. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज पुन्हा त्यांच्या पहिल्या पत्नीकडे गेले. तर प्रतीकने याआधी सान्या सागरशी पहिलं लग्न केलं होतं. 2023 मध्ये सान्या आणि प्रतीकचा घटस्फोट झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List