500 वर्षांपूर्वीचा हिंदूंचा छळ पाहून…; ‘छावा’बद्दल स्वरा भास्करची सडकून टीका
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. एकीकडे या चित्रपटावर प्रेक्षक आणि सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे अभिनेत्री स्वरा भास्करने त्यावरून टीका केली आहे. ‘छावा’ला मिळणाऱ्या भरभरून प्रतिक्रियांची तुलना तिने काही काळापूर्वी महाकुंभमध्ये घडलेल्या दुर्घटनेशी केली आहे. स्वरा तिच्या बेधडक मतांसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ती तिची मतं बिनधास्तपणे मांडत असते. मात्र त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता ‘छावा’बद्दलच्या स्वराच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘एका सुशोभित आणि काल्पनिक चित्रपटात 500 वर्षांपूर्वी हिंदूंवर होणारा अत्याचार पाहून लोक संतापलेले दिसत आहेत. परंतु महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी आणि गैरव्यवस्थापनावर होणारे भयानक मृत्यू आणि जेसीबी बुलडोझरने मृतदेह उचलण्याबद्दल ते गप्प आहेत. हा समाज मेंदू आणि आत्म्याने मृत झालेला समाज आहे’, अशी टीका तिने केली आहे. स्वराने या ट्विटमध्ये थेट ‘छावा’चा उल्लेख केला नसला तरी तिच्या ट्विटमधील चित्रपटाचा संदर्भ हा ‘छावा’चाच असल्याचं स्पष्ट होतंय. त्यावरून नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘जर एखादा हिंदू व्यक्ती त्याच्या धर्माशी संबंधित गोष्टींबद्दल भावनिक होत असेल तर त्यात समस्या काय आहे,’ असा सवाल एकाने केला. तर ‘खऱ्या इतिहासात इतक्या भयानक गोष्टी घडल्या आहेत की ते दाखवण्यासाठी बऱ्याच गोष्टी लपवाव्या लागल्या’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
स्वरा भास्करचं ट्विट-
A society that is more enraged at the heavily embellished partly fictionalised filmy torture of Hindus from 500 years ago than they are at the horrendous death by stampede & mismanagement + then alleged JCB bulldozer handling of corpses – is a brain & soul-dead society. #IYKYK
— Swara Bhasker (@ReallySwara) February 18, 2025
‘छावा’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवणयात आली आहे. यामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई आणि अक्षय खन्ना हा औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत 200 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावरही ‘छावा’चीच चर्चा पहायला मिळतेय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List