नशेली पानाचा बेरंग , शिरूरमध्ये पोलिसांनी पानटपरी चालकांविरोधात उघडली मोहिम
>> मुकुंद ढोबळे
वाढती व्यसनाधीनता हा समाजातील चिंतेचा विषय आहे. याला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा येनकेन प्रकारेन प्रयत्न करत आहे. तथापि व्यसनांचा विळखा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. हे शिरूरमध्ये पोलिसांनी पानटपरी चालकांविरोधात उघडलेल्या मोहिमेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
पान हे आरोग्यासाठी पोषक असल्याचे सर्वानुमत आहे. पण, याच पानाचा अमली पदार्थांच्या सेवनासाठी दुरूपयोग केला जात आहे. पानात अमली पदार्थ टाकून नशा करण्याचा फंडा अलीकडे वाढला आहे. तरुणाई या पानाकडे खेचली जात आहे. याचाच फायदा उठवत टपरीचालकांनी अशा पानांची विक्री सुरू केली आहे. यातून ते बक्कळ कमाई करत आहेत. शहरापासून गावखेड्यापर्यंत या नशेली पानाचे लोण पोहोचले आहे. शिरूर पोलिसांनी अशा पानाची विक्री करणाऱ्या टपरीचालकांविरोधात मोहीम उघडत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कासारी फाटा येथील मल्हार पान शॉपचा चालक शुभम गोरक्ष वीर (वय 25, रा. कोंढापुरी, ता. शिरूर), तसेच कोरेगाव भीमा येथील जयमल्हार पान शॉपचा चालक शाहरूख रफीक शेख (वय 22, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या टपरीचालकांचा कारनामा लक्षात येताच पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे, हवालदार अमोल दांडगे, श्रीमंत होनमाणे, महेंद्र पाटील, बापू हाडगळे, विकास सरोदे, हनुमंत गिरमकर, योगेश आव्हाड यांच्या पथकाने संबंधित टपऱ्यांवर छापा टाकून ही कारवाई केली. प्रतिबंधित पानमसाले व पावडरचा वापर करून हे पान बनविले जात असल्याचे या छाप्यातून उघड झाले. पोलिसांनी हे पान मसाले आणि पावडर जप्त करून अन्न व औषध विभागाकडे तपासणीसाठी पाठविले आहे.
तरुणाईत या पानाची क्रेझ वाढली आहे. या व्यसनापासून त्यांना वेळीच आवरणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांचे आयुष्य बेरंग होऊ शकते. यासाठी पालकांनी दक्ष राहायला हवे. तसेच अशा पानांची विक्री करणाऱ्यांनाही आळा बसणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List