Nanded News- कुंभमेळ्यात स्नान करुन अयोध्येला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, चार जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्हात महाराष्ट्राच्या भाविकांचा भयंकर अपघात झाला आहे. कुंभमेळ्यात स्नान करुन भाविकांना घेऊन एक टेम्पो ट्र्रॅव्हलर अयोध्येला निघाला होता. याच दरम्यान बाराबंकी जिल्ह्यातील लोणी कटरा पोलीस स्टेशन हद्दीत रस्त्यावर उभ्या असलेल्या बसवर हा टेम्पो ट्रॅव्हलर जाऊन धडकला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
सकाळी साडेपाच वाजता कुंभमेळ्यात स्नान करुन नांदेड व परिसरातील काही मंडळी अयोध्येकडे रामलल्लाच्या दर्शनासाठी जात होते. सदरची मंडळी टेम्पो ट्रॅव्हलरने जात होती. याच दरम्यान उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील लोणी कटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्वांचल एक्सप्रेस रोडवर रोडच्या बाजूला नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या बसवर भरधाव वेगाने ही टेम्पो ट्रॅव्हलर आदळली. त्यामुळे झालेल्या अपघातात एकूण चार जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर उर्वरित 16 जण जखमी झाले आहेत. या चार जणांमध्ये तीन जण नांदेडचे असून, एक जण हिंगोली जिल्ह्यातील असल्याचे वृत्त आहे. सुनिल दिगंबरराव वरपडे (50) , अनुसया दिगंबर वरपडे (80) , दिपक गणेश गोदले स्वामी (40) , जयश्री कुंडलिकराव चव्हाण (50) अशी या मृत व्यक्तींची नावे आहेत. या अपघातात एकूण 16 जण जखमी असून, त्यांच्या संपर्कात नांदेड पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मृतांच्या शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह नांदेडकडे आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List