संस्कृती-बिंस्कृती- किन्नरांना हवेत सांस्कृतिक हक्क!
>> डॉ. मुकुंद कुळे
पन्नास-साठ वर्षांपूर्वी जगभरात जेव्हा तृतीयपंथीयांच्या हक्काचा लढा सुरू झाला, तेव्हा कुठे आपणही माणूस असल्याची जाणीव भारतातील किन्नर समाजाला झाली. आतापर्यंत किन्नर समाजाकडे घृणेनेच पाहिले जायचे. अद्यापही या दृष्टिकोनात फारसा फरक पडलेला नाही. परंतु किमान आता कायद्याची तरी साथ आहे. मुख्य म्हणजे तृतीयपंथी असणं ही विकृती नसून प्रकृतीच आहे हे आता विज्ञानाने सिद्ध झालं आहे. त्यामुळे हळूहळू का होईना आता तृतीयपंथीयांना समाज स्वीकारू लागला आहे. परंतु त्यांच्या सांस्कृतिक स्थानाचं काय? ते आम्ही त्यांना परत देणार आहोत का? लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचा बहुधा तोच प्रयत्न होता आणि त्या उज्जैनच्या कुंभमेळ्यात यशस्वीही झाल्या.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि अमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भात आरोप झालेल्या ममता कुलकर्णीला प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्यातील किन्नर आखाडय़ात महामंडलेश्वर म्हणून अभिषेक करण्यात आला तेव्हाच खरं तर शंकेची पाल चुकचुकली होती की, ममताला अभिषेक करणाऱया लक्ष्मी नारायण त्रिपाठीला हे प्रकरण जड जाणार म्हणून. कारण मुळात 2016 च्या उज्जैन कुंभमेळ्यात जेव्हा प्रथमच किन्नर आखाडय़ाची घोषणा करण्यात आली आणि भारतभरातील किन्नरांनी जेव्हा लक्ष्मी नारायण त्रिपाठीला आपली महामंडलेश्वर म्हणून निवडलं तेव्हाच खरं तर वादाला सुरुवात झाली होती. तेव्हा किन्नरांच्या या आखाडय़ाला कुंभमेळ्यातील इतर सर्वच आखाडय़ांचा विरोध होता. परंतु इतर सर्वच पंथ-संप्रदायांचे आखाडे असताना ज्यांना साक्षात् देवयोनी मानलं गेलं त्या किन्नरांचा आखाडा का नाही? असा सवाल तेव्हा लक्ष्मी नारायण त्रिपाठीने उपस्थित केला होता आणि स्वतंत्र आखाडय़ासाठी आंदोलनही छेडलं होतं. केवळ त्या आंदोलनामुळेच कुंभमेळ्याच्या इतिहासात प्रथमच किन्नरांचा पहिला आखाडा उज्जैनच्या कुंभमेळ्यात उभा राहिला व सगळ्या किन्नरांनी किन्नर असलेल्या लक्ष्मीलाच आपल्या आखाडय़ाचा महामंडलेश्वर म्हणून घोषित केलं. तेव्हापासूनच किन्नर आखाडा आणि लक्ष्मी अनेकांच्या नजरेत खुपत होती. ममता प्रकरणाने त्यांच्या हाती आयतंच कोलित दिलं एवढंच. आता ममता कुलकर्णी किन्नर वा साध्वी नसताना लक्ष्मीने महामंडलेश्वर म्हणून तिला अभिषेक का केला कुणास ठाऊक? अर्थात तिचे काही आडाखे तेव्हा त्यामागे असतीलही. मात्र तेच निमित्त करून सनातन्यांनी लक्ष्मीची महामंडलेश्वरपदावरून गच्छंती करून आपला डाव साधला. कारण त्यांचा मुळातच लक्ष्मी व किन्नरांच्या आखाडय़ाला विरोध होता.
…आणि इथेच खरी गोम आहे. इथेच खरं सांस्कृतिक राजकारण आहे. म्हणजे एकीकडे गेल्या काही वर्षांत राज्य आणि देशपातळीवर तृतीयपंथीयांना समाजात सामावून घेण्याचे प्रयत्न होत आहेत. तामीळनाडू सरकारने राज्य पोलीस दलातील सेवेचे दरवाजे तृतीयपंथी व्यक्तींसाठी खुले केले. अगदी शहर नियोजनामध्ये ज्या मुताऱया उभ्या राहतील त्यात महिला, पुरुषांप्रमाणे तृतीयपंथीयांसाठीही वेगळी मुतारी हवी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानेही दिले. तरी दुसरीकडे मात्र तृतीयपंथीय एकूणच आपल्या पारंपरिक हक्कांसाठी भांडतात दिसत आहेत. अशा पार्श्वभूमीवर 2016 मध्ये लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली किन्नर समाजाने काशीच्या विश्वनाथ मंदिरात महापूजा केली आणि ती एकूणच भारतातील किन्नर समाजासाठी मोठी ाढांतिकारी घटना होती. कारण मधल्या काळात केवळ मंदिरच नाही, तर भारतीय संस्कृतीपासूनच किन्नर समाजाला दूर ठेवण्यात आलं होतं.
सनातन्यांचा सांस्कृतिक भेदभाव तिथेच होता आणि तोच निपटून काढण्याचा प्रयत्न तेव्हा लक्ष्मी यांनी केला होता. एकवेळ समोरच्याला सामाजिक स्थान द्यायला सनातनी तयार होतात, पण धार्मिक व सांस्कृतिक स्थान द्यायला तयार होत नाही. कारण सामाजिक स्थान देण्याने परंपरेने चालत आलेल्या धार्मिक किंवा सांस्कृतिक उतरंडीत व चौकटीत तसा फारसा फरक पडत नाही. अंतर्गत शुचिता कायम राहते. पण याउलट जर कुणी परंपरेतलं धार्मिक व सांस्कृतिक स्थान मागितलं, तर परंपरावाद्यांच्या भुवया लगेच विस्फारल्या जातात. कारण यामुळे सांस्कृतिक ठेकेदारीला धोका पोहोचण्याचा संभव असतो… आणि त्या ठेकेदारीलाच भारतीय किन्नरांचं नेतृत्व करणाऱया लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी तेव्हा सुरुंग लावला होता.
आधी त्यांनी उज्जैनच्या कुंभमेळ्यात तृतीयपंथीयांचा वेगळा आखाडा हवा म्हणून वेगवेगळ्या संत व महंतांना वेठीस धरलं आणि त्यांच्याशी तार्किक कसोटीवर वाद घालून अखेर उज्जैनच्या कुंभमेळ्यात किन्नरांसाठी वेगळा आखाडा निर्माण केला. एवढंच नाही, तर शिष्यांसह शाहीस्नानही केलं. त्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होताच किन्नरांचा एक मोठा समूह काशीला पोहोचला आणि ज्ञात इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी मंदिरप्रवेश केला. तोही काशी विश्वनाथाच्या मंदिरात! या दोन्ही घटना पुरेशा बोलक्या होत्या. आम्हाला केवळ सामाजिक स्थान नकोय, तर आमचं हरवलेलं धार्मिक व सांस्कृतिक स्थानही परत हवंय, हेच या दोन्ही घटना जणू सुचवत होत्या आणि ते एकापरीने योग्यही होतं. कारण भारतीय उपखंडातील संस्कृतीचा मागोवा घेतला, तर आज तृतीयपंथी म्हणून समाजात ओळख असलेला हा समाज हजारो वर्षांपूर्वी किन्नर म्हणून प्रसिद्ध होता. भारतीय पुराण ग्रंथात, तसंच बौद्ध ग्रंथांतही या समाजाचे उल्लेख सापडतात. अर्धदेवयोनी मानला जाणारा आणि अप्सरा-यक्ष-गंधर्वांप्रमाणेच कलावंत म्हणून प्रसिद्ध असलेला किन्नर समाज म्हणजेच आजचे तृतीयपंथी. अगदी महाभारतातील द्रुपदपुत्र शिखंडीलाही किन्नरच मानलं गेलंय. तसंच एक वर्षाच्या अज्ञातवासात अर्जुनाचं बृहन्नडेच्या रूपात झालेलं परिवर्तन ही त्याची किन्नरावस्थाच असल्याचं मानलं जातं. मुख्य म्हणजे शिखंडी काय किंवा बृहन्नडा काय कुणाकडेही त्या काळात घृणेने पाहिलं गेलं नाही किंवा त्यांना हीनही मानण्यात आलं नाही. उलट त्यांची जी मूळ प्रवृत्ती होती, तिचा गौरवच केला गेला. पुराणकाळात कलावंत म्हणून नावारूपाला आलेल्या किन्नर समाजाने बुद्धकाळात मुत्सद्यांची भूमिकाही निभावली. संघराज्याच्या काळात सामंतराजे, जहागिरदार किन्नरांना आपले सल्लागार म्हणून नेमत असत. एखादी गणिका ज्याप्रमाणे राज्याची शोभा वाढवत असे त्याचप्रमाणे त्या काळात हुशार किन्नर बाळगणे प्रतिष्ठेचे मानले जाई. कारण गणिका व किन्नर केवळ कलानिपुण नाही, तर व्यवहार चतुरही असायचे. त्यामुळेच हा किन्नर समाज मोठमोठय़ा हवेल्या आणि कोठय़ा बाळगून होता. कामसूत्रकार वात्स्यायनाने किन्नरांना तृतीय प्रकृती नायिका म्हणून संबोधलं आहे. एखादा राजपुत्र किंवा श्रेणिक म्हणजेच धनिक पुत्र कापीडेत निपुण नसेल, तर त्याला सुरत ाढाrडा शिकवण्यासाठीही खास तृतीय प्रकृती नायिकेची म्हणजेच किन्नरांची नेमणूक केली जायची. मुस्लिम आाढमकांनंतरही किन्नरांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठेला धक्का लागला नाही. उलट मुस्लिम शासकांनी प्रशासकीय कामगिरीपासून खासगी कामगिरीपर्यंतच्या जबाबदाऱया किन्नरांवर सोपवल्या. मुस्लिम राजवटीतच किन्नरांना `हिजरा’ म्हणून संबोधलं जाऊ लागलं. त्याचा अपभ्रंश म्हणजेच आजचं `हिजडा’ हे संबोधन, पण संबोधन काहीही असलं तरी या समाजाने आपली प्रतिष्ठा कधीच गमावली नव्हती. जन्मविधी किंवा लग्नविधीसारख्या प्रसंगी नाचगाण्यासाठी आणि दुवा मागण्यासाठीही आवर्जून किन्नरांना निमंत्रण दिलं जायचं.
दुसरीकडे ना धड स्त्राr, ना धड पुरुष असलेल्या किन्नरांना आपल्या समाजचौकटीतूनच बाहेर फेकण्याचे उद्योग संस्कृती रक्षकांनी सुरू केले होते. त्यातूनच किन्नरांकडे घृणेने, तिरस्काराने पाहणे सुरू झाले. भारतात ब्रिटिशांची सत्ता सुरू झाल्यावरच किन्नरांची परवड सुरू झाली. कारण ब्रिटिशांनी भारतातील सर्व संस्थानं खालसा केल्यावर त्या-त्या संस्थानिकांना ब्रिटिशांनी नेमून दिलेल्या तनख्यावरच गुजराण करावी लागायची. परिणामी राजे-रजवाडे आणि नवाबांच्या ऐषोआरामाला खीळ बसली. करमणुकीसाठी पदरी नृत्यांगना किंवा किन्नरांना बाळगणं जड जाऊ लागलं. हळूहळू या समाजाची सामाजिक पत तर गेलीच आणि सांस्कृतिक ओळखही हरवली. पैसा नसल्याने त्यांच्यावर जगण्यासाठी दारोदार भटकण्याची पाळी आली. ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केल्याचं निमित्त करून सनातन्यांनी आता लक्ष्मी यांचंच महामंडलेश्वर पद निकालात काढलं आहे. शेवटी स्त्राrचाही योग्य तो सन्मान न करणारे परंपरावादी, तृतीयपंथीयांचा कसा सन्मान करणार हा प्रश्न होताच!
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List