सरपंचांचे पर्यटन की अभ्यासदौरा? कुलू मनालीततील अभ्यास दौऱ्यासाठी 7 लाखांची उधळपट्टी
पर्यटनस्थळांची निवड करत रत्नागिरी पंचायत समितीने तालुक्यातील सरपंचांचा अभ्यासदौरा आयोजित केला आहे. या अभ्यासदौऱ्याच्या नावाखाली पंचायत समितीने सेस फंडमधून 7 लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे. पंचायत समितीचा 7 लाख रुपयांचा सेस फंड आणि अधिक स्पॉन्सरशीप असा हा दौरा असल्याची माहिती पुढे आली आहे. रत्नागिरी तालुक्यात 14 ग्रामपंचायती असतानाही अभ्यासदौऱ्यामध्ये फक्त 48 सरपंच आहेत. सरपंचपद नसलेल्या दोन खासगी व्यक्तीनाही या दौऱ्यामध्ये सहभागी करून घेतल्यामुळे याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
हिमाचल प्रदेश, कुल्लू मनाली, सिमला या ठिकाणी जाऊन हे सरपंच अभ्यास करणार आहेत. रत्नागिरी पंचायत समितीच्या माध्यमातून हा सरपंचांचा 8 दिवसांचा अभ्यासदौरा आयोजित केला आहे. हा दौरा सध्या सुरु आहे. या सरपंचांच्या अभ्यासदौऱ्यामध्ये 50 सरपंच असल्याची माहिती सुरुवातीला सांगण्यात आली. पण प्रत्यक्षात 48 सरपंच असून दोन खासगी व्यक्ती आहेत. रत्नागिरी तालुक्यात अनेक विकासकामे रखडलेली असताना राज्याबाहेरचे हे दौरे कशासाठी? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. दोन खासगी व्यक्तींच्या समावेशाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनभिज्ञ आहेत.
राज्यातला दौरा कोणी बदलला?
रत्नागिरी पंचायत समिती गेली दोन वर्ष सरपंचांचा अभ्यासदौरा आयोजित करत आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात सरपंचांच्या अभ्यासदौऱ्याचा ठराव करण्यात आला. त्यावेळी हा दौरा महाराष्ट्रामध्येच काढण्याचे निश्चित झाले होते. अचानक हा दौरा राज्याच्या बाहेर पर्यटनस्थळी नेण्याचा डाव कोणी आखला? हिमाचल प्रदेशला जाण्याचे नियोजन कोणी केले? याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायतीचा उत्कृष्ट कारभार असताना तो न पाहता हिमाचल प्रदेशची निवड का केली? हा ही प्रश्न आता उपस्थित होत आहे. तसेच पंचायत समितीच्या 7 लाख रुपयांच्या निधीतून हिमाचल प्रदेशचा दौरा होणार नाही हे माहित असताना स्पॉन्सरशीप घेऊन दौरा करण्याचा अट्टाहास का केला? जर तालुक्यातील सर्वच सरपंच अभ्यासदौऱ्यात सहभागी झाले असते तर पंचायत समितीचे 7 लाख रुपये किती पुरेसे पडले असते? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या फोनने धाबे दणाणले
हिमाचल प्रदेशमध्ये सरपंचांचा अभ्यास दौरा सुरु असतानाच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने फोन करून अभ्यासदौऱ्याबाबत विचारणा केली. तसेच या दौऱ्याबाबतची सर्व माहिती मला लिखीत स्वरुपात उपलब्ध व्हावी अशी मागणी केल्यामुळे आता धाबे दणाणले आहेत.
सरपंचांच्या अभ्यासदौऱ्याबाबत आम्ही सूचना दिल्या आहेत. त्याठिकाणी तुम्ही ज्या काही भेटी द्याल त्याचा अहवाल आम्हाला दिला पाहिजे. तसेच अभ्यासदौऱ्यात तुम्ही पाहिलेल्या उपक्रम आणि योजनांची काय अंमलबजावणी करणार आहात याची माहितीही आम्हाला दिली पाहिजे
– किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी
पंचायत समितीच्या निधीतून अभ्यासदौऱ्यात सहभागी झालेल्या फक्त 48 सरपंचांचाच खर्च केला जाणार आहे. अन्य दोन व्यक्तींचा खर्च पंचायत समिती करणार नाही तसेच पुढील वर्षापासून आम्ही हे अभ्यासदौरे रद्द करणार आहोत.
– जे.पी. जाधव, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, रत्नागिरी
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List