‘लक्ष्मी निवास’च्या प्रोमोमध्ये दिसली दुसरी मुलगी; अखेर अशी झाली दिव्या पुगावकरची निवड
सध्या मालिकाविश्वात ‘लक्ष्मी निवास’चीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करतेय. या कुटुंबातली शेंडेफळ म्हणजेच जान्हवीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने तिच्या निवडीविषयीचा रंजक किस्सा सांगितला. या मालिकेत हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेसाठी दिव्याची सर्वांत शेवटी निवड झाली होती. विशेष म्हणजे या मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये जान्हवी म्हणून ज्या मुलीला दाखवण्यात आलं होतं, ती दिव्या नव्हतीच. दिव्याच्या जागी दुसऱ्या मुलीला प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं होतं.
आपल्या निवडीविषयी दिव्या म्हणाली, “‘लक्ष्मी निवास’ मालिकेसाठी माझी कास्टिंग सर्वात शेवटी झाली होती. माझ्या कास्टिंगचा एक गमतीशीर किस्सा आहे. मला ऑडिशनला बोलावण्यात आलं होतं. मी ऑडिशनही दिलं, मग मला कॉल आला कि 99 टक्के तुमचं सिलेक्शन होताना दिसत आहे. हे सर्व झालं पण अजून माझं कास्टिंग झालं नव्हतं आणि मला दुसऱ्या दिवशी ‘लक्ष्मी निवास’चा पहिला टीझर दिसला. ज्यात एक फॅमिली फोटो दाखवला गेला होता. त्यात अक्षया देवधर स्पष्ट दिसत होती आणि जान्हवीचं पात्र होतं तिथेही एक मुलगी दिसली. तेव्हा वाटलं की काही गोष्टी जुळल्या नसतील म्हणून आपलं कास्टिंग नाही झालं. पण मी टीझर पाहून खूप खुश झाले होते कारण तो खूप छान दिसत होता.”
“थोड्या वेळातच मला निर्माते सुनील भोसले यांचा कॉल आला. मी आधी त्यांचं अभिनंदन केलं कारण माझा असा गैरसमज होता की माझं कास्टिंगच झालं नाहीये. तेव्हा ते म्हणाले की तूच जान्हवी आहेस, आम्ही प्रोमोसाठी फक्त एका मुलीला बोलावलं होतं. अशा पद्धतीने माझी कास्टिंग झाली. जसं प्रत्येक कुटुंबामध्ये एक सदस्य खास असतो तसंच ‘लक्ष्मी निवास’मध्ये आहे. मी हर्षदा ताईला आधीपासून ओळखते. तिच्यासोबत काम करण्याची फार इच्छा होती आणि ती आता पूर्ण होत आहे. लहानपणापासून मी तिला स्क्रीनवर बघत आली आहे,” असं ती पुढे म्हणाली.
शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा अनुभव सांगताना दिव्या म्हणाली, “आता माझे दोन कुटुंब आहेत. एक रिअल लाइफ फॅमिली आणि एक रील लाइफ फॅमिली, जी ‘लक्ष्मी निवास’ची आहे. मला आजही शूटिंगचा पहिला दिवस आठवतोय. मी टीममध्ये सर्वांत शेवटी आले आणि त्यादिवशी मी सर्वात आधी अक्षयाला म्हणजे भावनाला भेटले. कारण आम्ही दोघी व्हॅनिटी शेअर करत होतो. तिचं असं रिअक्शन होतं “अच्छा फायनली जान्हवी तू करतेयस का? आता शूटिंग सुरु होईल. कारण बऱ्याच दिवसांपासून जान्हवीचं कास्टिंग राहील होतं आणि खूप मुली यायच्या जान्हवीच्या भूमिकेसाठी पण काही जमत नव्हतं.” लक्ष्मी निवास ही मालिका दररोज रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List