सिनेमात रोल दिला, CM च्या हस्ते उद्घाटन केलं; नंतर संगळंच फ्रॉड निघालं! माजी CM च्या मुलीला 4 कोटींचा गंडा
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी अभिनेत्री आरुषी निशंक हिला मुंबईतील दोन चित्रपट निर्मात्यांनी कोट्यवधींचा गंडा घातला आहे. सिनेमात रोल देण्याचे आमिष दाखवत आपली 4 कोटी रुपयांची फसवणूक झाल्या आरोप आरुषीने केला आहे. याप्रकरणी चित्रपट निर्माते मानसी वरुण बागला आणि वरुण प्रमोद कुमार बागला यांच्याविरोधात देहरादूनच्या राजपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरुषी निशंक हिची ‘हिमश्री फिल्म प्रायव्हेट लि.’ नावाची चित्रपट निर्मितीची कंपनी आहे. चित्रपट निर्मितीसह ती अभिनयही करते. गेल्या वर्षी मानसी वरुण बागला आणि वरुण प्रमोद कुमार बागला यांनी आरुषीशी संपर्क साधला आणि आपण मुंबईतील जुहू भागात असलेल्या ‘मिनी फिल्म प्रायव्हेट लि.’ या कंपनीचे संचालक असल्याचे सांगितले. आपण ‘आँखो की गुस्ताखिया’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती करत असून यात शनाया कपूर आणि विक्रांत मेस्सी प्रमुख भूमिकेत आहेत, असे सांगितले. या चित्रपटातील आणखी एक प्रमुख भूमिका आरुषीला ऑफर करण्यात आली.
चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करायची असेल 5 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, असे आरुषीला सांगण्यात आले. तसेच चित्रपटाच्या नफ्यातील 20 टक्के रक्कम आरुषीला देण्यात येईल आणि चित्रपटाची स्किप्ट आवडली नाही किंवा भूमिका आवडली नाही तर गुंतवलेले पैसे वार्षिक 15 टक्के व्याजाने परत केले जातील, असे सांगण्यात आले.
आमिषाला भुलून आरुषी हिच्या ‘हिमश्री फिल्म प्रायव्हेट लि.’ आणि ‘मिनी फिल्म प्रायव्हेट लि.’मध्ये 9 ऑक्टोबर 2024 रोजी सामंजस्य करार झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 10 ऑक्टोबर 2024 रोजी आरुषीने 2 कोटी रुपये आरोपींना दिले. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी 1 कोटी आणि 27 ते 30 ऑक्टोबर या काळात आणखी 1 कोटी असे एकूण 4 कोटी रुपये आरोपींना दिले. आरुषीचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी चित्रपटाच्या सेटवर एक भव्य सोहळाही घेतला आणि यासाठी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनाही आमंत्रित केले होते.
आरोपींनी त्यांच्या अधिकृत पेजेस आणि इन्स्टाग्रामवरून मला प्रमोट करण्याचे वचन दिले होते. मात्र ना स्क्रिप्ट फायनल करण्यात आली, ना चित्रपटात भूमिका देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच आरुषीने आरोपींनीकडे पैशाची मागणी केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. एवढेच नाही तर आरुषीला आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची, तसेच खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकीही दिली. अखेर आरुषीने दोन्ही आरोपींविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List