आमदार लांडगेंना माझे नाव घ्यायला वाईट काय वाटले? अजित पवार यांनी सुनावले
ज्याने चांगले काम केले, त्याला चांगले म्हणायला शिका. ज्याने केले त्याला मी त्याचे श्रेय देतो. मात्र, आमदार लांडगे यांना माझे नाव घेण्यास काय वाईट वाटले मला माहिती नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी लांडगे यांना सुनावले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन तसेच पुणे पोलीस अधीक्षक कार्यालय भूमिपूजन आणि पिंपरी महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
या कार्यक्रमात बोलताना आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडच्या सर्व विकासाचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. त्यांनी अजित पवार यांचे नाव घेणे टाळले. त्यामुळे तिळपापड झालेल्या अजितदादांनी आपल्या भाषणात लांडगेंना चांगलेच सुनावले.
अजित पवार म्हणाले, ‘1992 ला मी पिंपरी-चिंचवडचा पहिल्यांदा खासदार झालो. शहरातील प्रत्येक गोष्ट मी लक्ष देऊन करत आहे. अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेऊन चर्चेतून मार्ग काढत असतो. 15 ऑगस्ट 2018 ला देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तालय सुरू केले. आता आयुक्तालयाची इमारत होत आहे. त्यासाठी मी कितीवेळा अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या, किती प्रयत्न केले, हे अधिकाऱ्यांना माहिती आहे. शहरात उड्डाणपूल, प्रशस्त रस्ते, उद्याने विकसित केली. शहराचा कायापालट कोणी केला, हे संपूर्ण शहरवासीयांना माहिती आहे. मात्र, आमदार महेश लांडगे यांना माझे नाव घेण्यास काय वाईट वाटले मला माहिती नाही.’
यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार बाबाजी काळे, आमदार बापू पठारे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप, विजय शिवतारे, शरद सोनवणे, अमित गोरखे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त शेखर सिंह, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.
जाहिरातींतून अजित पवारांची छबी गायब
कार्यक्रमानिमित्त भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी शहरात विविध भागात फलक लावले, वृत्तपत्रांत जाहिराती दिल्या. या जाहिराती आणि फलकांवर भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातील नेत्यांचे फोटो छापले. मात्र, या जाहिरातींमधून पालकमंत्री अजित पवार यांची छबी गायब होती. त्यामुळे महायुतीत अलबेल नसल्याचे दिसून आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List