उरण पाठोपाठ नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव, मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह, दहा किमी परिसरात हाय अलर्ट
नागपूर येथे वाघांना बर्ड फ्लू झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील उरण येथील चिरनेर येथे कोंबड्यांना बर्ड फ्लूचा झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. कारण नांदेडच्या किवळा येथील कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे अनेक कोंबड्या आणि त्यांची अंडी नष्ट करण्यात आली आहेत.पशू संवर्धन विभागाने या संदर्भात संरक्षणात्मक उपाययोजना सूरू केल्या आहेत. अद्याप या बर्ड फ्ल्यूचा मानवाला संसर्ग झाला नसल्याने बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये तसेच अफवा आणि गैरसमज पसरवू येऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रायगड जिल्ह्यातील उरणच्या चिरनेर येथे कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्यात आली होती. चिरनेर येथील पॉल्ट्री फॉर्मच्या कोंबड्या मृत झाल्यानंतर प्रशासनाने एक किलोमीटर परिसरातील १,२३७ कोंबड्या आणि अंडी नष्ट केली होती. तर दहा किलोमीटर परिसरातील कोंबड्यांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले होते. कोंबड्यांचे मांस खाताने नीट शिजवून खाण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
किवळा येथील परिसर अलर्ट झाेन
नांदेड जिल्हयात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे.नांदेडच्या लोहा तालुक्यातील किवळा येथे मृत कुकुट पक्षांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . त्यामूळे पशू संवर्धन विभागाकडून तातडीने उपाययोजना सूरू केल्या आहेत. कीवळा येथील शेतकरी पंजाब टरके यांच्या मोकळ्या कुकुट पालन केंद्रातील कोंबड्यांची 20 पिल्ले मृतावस्थेत आढळले होती. पशुसंवर्धन विभागाने या मृत कुकुट पक्षांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून हे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. मृत कुकुट पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे किवळा येथील दहा किलोमीटर परिसर अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे.
बाजारपेठा बंद राहणार
खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ५६५ कोंबड्यांची पिल्ले पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावली आहे. आजूबाजूच्या परिसरात बर्ड फ्ल्यूचा प्रसार होऊ नये यासाठी किवळा येथील दहा किलो मीटर क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित केले आहे. या परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्रीची दुकाने, कुक्कुट मांसाची चिकन दुकाने, वाहतूक, बाजार आणि यात्रा, बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत .
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List