बोगस मतदानाने दिल्ली जिंकण्याचा भाजपचा प्लॅन, केजरीवाल यांचा गंभीर आरोप
भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले असून त्यांना दिल्लीची विधानसभा निवडणुक बोगस मतदानाद्वारे जिंकायची आहे. त्यासाठी त्यांनी योजनाही आखायला सुरुवात केली आहे, असा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला.
गेल्या 15 दिवसांत मतदारांच्या आकडेवारीत गडबड असल्याचे दिसून आले. भाजपने मतदारांच्या याद्यांमध्ये छेडछाड केली असून यादरम्यान भाजपने 5 हजार नावे कापून साडेसात हजार नवी नावे जोडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. 12 टक्के मतदारांच्या नावांशी छेडछाड करण्यात आली असून निवडणुकीच्या नावाखाली भाजपा खेळ खेळत असल्याची टीकाही केजरीवाल यांनी केली. भाजपला कोणत्याही परिस्थितीत दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकायची आहे, मग त्यासाठी चुकीचा मार्ग निवडावा लागला तरी बेहत्तर अशी भाजपची वृत्ती असल्याचे केजरीवाल म्हणाले.
मतदारांची नावे गायब करण्यासाठी 11 हजार अर्ज
भाजपाने एकल मतदारसंघातून मतदारांची नावे गायब करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तब्बल 11 हजार अर्ज केले होते. परंतु, मुख्य निवडणुक आयुक्तांनी यात लक्ष घातले. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये गोंधळ होण्यापासून आम्हाला भाजपला रोखता आले असा दावाही केजरीवाल यांनी केला.
जिल्हा निवडणूक अधिकाऱयांना पत्र
गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून मोठय़ा संख्येने नावे गायब करण्यात आली आहेत. ही बाब केजरीवाल यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून निदर्शनास आणली आहे. तसेच याप्रकरणी निवडणूक अधिकाऱयांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह
निवडणुकीच्या नावावर या देशात खेळ सुरू असून जर 12 टक्के मतदारांची नावे गायब केली तर काय राहील. जर आकडय़ांमध्ये गडबड असेल तर निवडणूक आगोयावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र आणि हरयाणाप्रमाणे रडीचा डाव
महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांमध्ये जसा रडीचा डाव भाजपने खेळला तसाच डाव त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीतही खेळायचा आहे, असा आरोपही केजरीवाल यांनी केला. चिटिंग करून निवडणुका जिंकणे हेच त्यांचे एकमेव ध्येय आहे. परंतु, आम्ही त्यांना त्यात यशस्वी होऊ देणार नाही, असे केजरीवाल म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List