खड्डय़ात गेलं ‘ते’ मरण! कसबा बावड्यातील घटना… तात्या तिरडीवरून टुणकन उठले
मुखात विठ्ठलाच्या नामस्मरणातून अखंड हरिनामाचा गजर करत असतानाच, हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे तो वैकुंठी गेलेला मृतदेह नातेवाईकांच्या अंत्यदर्शनासाठी घरी घेऊन येत असतानाच, वाटेतील रस्त्यांच्या खड्डय़ांमध्ये बसलेल्या धक्क्यांनी पुन्हा हालचाल करू लागला. नातेवाईकांनी पुन्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत पुन्हा हृदय सुरू झाल्याचा चमत्कार पाहायला मिळाला. म्हणजेच काय खड्डय़ात गेलं ते मरण आणि तात्या टुणकन उठले… वेळ आली होती, पण काळ आला नव्हता, अशीच स्थिती कसबा बावडा येथील 65 वर्षीय पांडुरंग रामा उलपे अर्थात पांडुरंग तात्या यांच्याबाबत घडली.
तात्या गेल्याचा निरोप आल्यानंतर नातेवाईक घरी येऊ लागले. अंत्यसंस्काराची तयारीही झाली. दरम्यान, तात्यांचा मृतदेह घरी आणताना रस्त्यावरील खड्डय़ात अॅम्ब्युलन्सचे चाक गेले. या धक्क्याने तात्यांच्या शरीरात हालचाल सुरू झाली. मग तत्काळ अॅम्ब्युलन्स डी. वाय. पाटील हॉस्पिटलकडे वळवली. तिथे डॉक्टरांनी तात्यांचे हृदय सुरू असल्याचे स्पष्ट केले.
फुलांच्या पायघडय़ाने स्वागत
बुधवारी सकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर फुलांच्या पायघडय़ा घालून वारकरी पांडुरंग उलपे यांचे वारकरी संप्रदायातील सहकाऱ्यांनी घरी स्वागत केले. महिलांकडून औक्षण करण्यात आले. तसेच त्यांना दीर्घ आयुष्य मिळावे, अशी प्रार्थना पांडुरंगाचरणी करण्यात आली.
पुन्हा तात्या अस्वस्थ
तात्यांना जणू काही पुनर्जन्मच मिळाल्याच्या वृत्ताने जिल्हाभर चर्चेचा विषय सुरू झाला. घरी प्रकृतीची विचारपूस करायला येणाऱ्या नातेवाईकांपासून ते प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दाखल होऊ लागले. या प्रकारापासून अनभिज्ञ असलेल्या तात्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याचे दिसून येऊ लागले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List