सर्वात मोठी बातमी! नव्या सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत मोठा निर्णय
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. सध्याचं राज्यातील वातावरण पाहाता या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जाणार? या बैठकीला कोण कोण मंत्री उपस्थित असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं? या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची उपस्थिती नव्हती. मात्र दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील तपासाचा आढावा देखील घेण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांची उपस्थिती
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर आरोप होत आहेत. वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीला शरण आला, दरम्यान वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या जवळीकतेमुळे मंत्री धनंजय मुंडे देखील चर्चेत आहेत. विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र आजच्या बैठकीला धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती.
दुसरीकडे मात्र अजित पवार हे या बैठीकला उपस्थित नव्हते. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर ही राज्य मंत्रिमंडळाची पहिलीची बैठक होती, मात्र या बैठकीला अजित पवार उपस्थित नव्हते. ते परदेश दौऱ्यावर असल्यामुळे बैठकीला उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार 4 हजार 849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार आहे, याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील 963 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या वर प्रतिक्रिया देताना बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा देखील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List