वाल्मीक कराड, गरीब राजकारणी! न्यायालयात वकिलाची ‘हास्यजत्रा’
अवादा पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागणारा, राजमहालासारख्या बंगल्यात राहणारा, बंगल्यासमोर आलिशान गाडय़ांची चळत उभी करणारा, किती बँकांमध्ये स्वतःची खाती आहेत आणि त्यावर किती पैसा आहे हे माहिती नसणारा, शेकडो एकर जमीन बाळगणारा वाल्मीक कराड हा ‘गरीब राजकारणी’ असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी न्यायालयात केल्याने बीडकरांचे डोळेच विस्फारले आहेत.
पुण्यात सीआयडीला शरण आल्यानंतर वाल्मीक कराडला मंगळवारी रात्री उशिरा केज न्यायालयासमोर उभे करण्यात आले. यावेळी वाल्मीकची बाजू मांडताना त्याचे वकील हरिभाऊ गुठे आणि अशोक कवडे यांनी तो अतिशय गरीब असल्याची अत्यंत मौलिक माहिती न्यायालयाला दिली. वाल्मीक कराड हा गरीब समाजसेवक असल्याचे या वकिलांनी न्यायालयाबाहेर असलेल्या पत्रकारांनाही सांगितले. वकिलांची ही ‘हास्यजत्रा’ पाहून बीडकरही चक्रावून गेले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर संतोष देशमुख हत्या तसेच खंडणी प्रकरणातील आरोपींचे बँक खाते सील करण्यात आले. यात वाल्मीक कराडच्या बँक खात्यांचाही समावेश आहे. किती बँक खाते सील करण्यात आले, त्या खात्यांवर किती रक्कम होती, याबद्दल तपास यंत्रणेने मूग गिळले आहेत. मात्र अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाल्मीक कराडच्या खात्यांवरील रक्कम पाहून अधिकाऱ्यांच्या डोळ्य़ांसमोर दिवसाच काजवे चमकले होते. शेकडो कोटींची उलाढाल करणारा वाल्मीक कराड हा गरीब कसा? असा प्रश्न आता बीडकरांना पडला आहे.
कराड येताच इतर आरोपी गेवराईत
केज न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर वाल्मीक कराडला बीड येथे शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत आणण्यात आले. येथे अगोदरच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार हे चार आरोपी ठेवण्यात आले आहेत. कराड येताच या चारही आरोपींना तातडीने गेवराई शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत हलवण्यात आले. या चौघांची चौकशी आता तेथेच करण्यात येणार आहे.
वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली
केजहून बीड पोलीस ठाण्याच्या कोठडीत मुक्कामी येताच वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली. त्याला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. रात्री त्रास वाढल्याने कोठडीतच ऑक्सिजन लावण्याची वेळ आली होती. सीआयडीच्या अधिकाऱयांना सकाळीच चौकशीला सुरुवात करायची होती; परंतु कराड सकाळी नऊ वाजेपर्यंत आराम करत असल्यामुळे चौकशी होऊ शकली नाही.
घुले, आंधळे, सांगळे कुठे आहेत?
संतोष देशमुख प्रकरणातील सातपैकी चार आरोपी सध्या कोठडीत आहेत. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे जण अजूनही तपास यंत्रणांशी लपंडाव खेळत आहेत. मालमत्ता जप्ती, बँक खाती गोठवूनही या तिघांवर परिणाम झालेला नाही. या तिघांच्या काही नातलगांना तपास यंत्रणांनी चौकशीसाठी बोलावले होते. परंतु त्यानेही काही फरक पडलेला नाही.
परळी ते पुणे व्हाया मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक
नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या झाली. खंडणी प्रकरण आणि हत्येचे प्रकरण चव्हाटय़ावर येताच वाल्मीक कराडने 10 डिसेंबरला परळी सोडली. तो ओंकारेश्वरला गेला. तेथून मध्यप्रदेशातील उज्जैन येथे पोहोचला. तेथे त्याने महाकालेश्वराचे दर्शन घेतले. हा दर्शनाचा पह्टो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर तो नागपूर मुक्कामी आला. हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत तो नागपुरातच पाहुणचार घेत होता. तेथून कर्नाटक, गोवा असा प्रवास करत तो पुणे मुक्कामी आला. हजारो किमी प्रवास करून 31 डिसेंबरला त्याने शरणागती पत्करली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List