विज्ञान-रंजन – पानगळ!
>> विनायक
पिकलेलं पान आपोआप गळून पडतं हे आपणही अनेकदा पाहत असतो. तीस-चाळीस वर्षांपूर्वी मुंबईसारख्या शहरात ठायीठायी वनश्री दिसायची आणि थंडीच्या दिवसांत रंगीबेरंगी पानांची पानगळ दिसून यायची. अनेक ठिकाणचा हा तरुतळी पडलेला ‘जीर्ण पाचोळा’ चालणाऱ्यांच्या पायाखाली कुरकुरायचा आणि कुसुमाग्रजांची ‘जीर्ण पाचोळा पडे तो उदास’ ही ओळ आठवायची.
काँक्रीटीकरणाच्या आणि उत्तुंग इमारतींच्या आताच्या युगात या ना त्या कारणाने वनसंपदा कमी होतेय. काही शहरांत तर कित्येकदा दूरवर एखादं झाड दिसत नाही असं रखरखाटी वातावरण असतं. निसर्गाशी ताळमेळ साधत विकास झाला तरच ती खरी प्रगती याचं भान जगभरच कमी होताना दिसतंच. त्यामुळे आता महानगरांमध्ये पानं-फुलं दिसण्याचीच वानवा निर्माण झाली तर ‘पानगळ’ कुठून दिसणार? मुंबईत ‘लॅबर्नम स्ट्रीट’सारखे बहाव्याचं झाडाचं नाव प्राप्त झालेले मार्ग निर्माण झाले. आमच्या राजावाडीत तर आम्ही बालपणापासून विविध फळ-फुलझाडं आणि वड-पिंपळ-चिंच अशा महावृक्षांची रेलचेल होती. पिंपळाची पानगळ तर थंडीत मोठय़ा प्रमाणात व्हायची. पहाटेच्या वेळी प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडावा तसा सुकल्या पानांचा सडा चांगली थंडी पडणार याची चाहूल द्यायचा.
या वर्षीही छान थंडी पडली आहे, परंतु गेल्या अर्धशतकात वाढता वाढता वाढे अशा प्रदूषणाने या थंडीचा ‘मझा किरकिरा’ करून टाकलाय. आता एखाद्या हिल स्टेशनवरच्या वनराजीतच पानगळीचा मोसम अनुभवायला जायला हवं म्हणून उंबरोलीला मित्राच्या फार्म हाऊसवर गेलो. तिथल्या जंगलात तरुतळी पडलेला पानांचा ढिग दिसत होता.
पानगळ हा एखाद्या झाडाच्या जीवनक्रमातली अटळ गोष्ट असते. माणसांच्या बाबतीतही त्वचा नळत ‘कात’ टाकत असते. केस गळून नवे येतात तसेच हेसुद्धा. त्याचा काळ मात्र थंडीचा. युरोप-अमेरिकेसारखे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातले देश ‘फॉलिल’ किंवा पानगळ मोठय़ा प्रमाणात अनुभवतात. तिकडे त्या बोलीभाषेत नुसतं ‘फॉल’ म्हणतात.
पान हे झाडाचं नाक. सूर्यप्रकाशात हीच पानं क्लोरोफिल किंवा हरितद्रव्य निर्माण करतात आणि झाड हिरवंगार दिसतं. उन्हाळय़ात ऊन ‘पिऊन’ त्यांचं हे कार्य जोमाने चालतं. थंडीत दक्षिण गोलार्धावर प्रकाशवारा सूर्य आपल्याकडे मंदावल्यासारखा वाटतो. दिवस लहान आणि रात्र मोठी असल्याने उन्हाची वेळ मुळातच कमी होते. त्यातही उत्तर गोलार्धातल्या अधिक उत्तरेकडच्या युरोप, स्पॅन्डिनेव्हिया या भागात आणि अमेरिका, रशियातही कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टी होते. हा ऋतुचक्राचा नियम आहे. निसर्ग न चुकता लाखो वर्षे तो पाळतोय आणि पानं-फुलंही लाखो वर्षे बहरतायत. पानगळ अनुभवतायत आणि पुन्हा नव्या जोमाने पालवी फुटून हिरवाईचं नंदनवन दिसू लागतंय.
अमेरिकेतल्या माझ्या मित्रांनी वीसेक वर्षांपूर्वी केवळ ‘फॉल’ अनुभवणारी पदयात्रा केली. उंचच उंच झाडांच्या पानांचे बदलते विविध रंग त्यांना इंद्रधनुषी किंवा कलाथडोस्कोपमधल्या काचांसारखे भासते. काही लालचुटूक झालेली, थोडी गुलाबी, काही पिवळसर आणि काही या रंगांमधल्या अनेक छटा दाखवणारी पर्णसृष्टी पाहून त्यांचं मन हरखून गेलं त्याचे फोटो त्यांनी मला पाठवले. सध्या आपल्याकडेही जिथे बदामाची झाडं असतील त्याचं ‘फॉलिज’ छान दिसतंय. सारी झाडं थोडय़ा हिरव्या, थोडय़ा लाल आणि पिवळय़ा पानांनी शोभिवंत दिसतायत आणि त्यांच्या पायतळी त्याच रंगांच्या पानांची भरपूर पानगळही जाणवतेय. सकाळी लवकर निवांत वेळेला फेरफटका मारायची संधी मिळाली तर कुतूहलाने अशी पानगळ जरूर पाहा.
औद्योगिक प्रगतीनंतर जगातला बराच समाज नगरवासी झाला. आखीव-रेखीव, उंचच उंच इमारतीचं वैभव आलं. प्रशस्त रस्तेही ठरावीक झाडांनी सजवले गेले, पण कृषी संस्कृतीच्या काळात, आपोआप उगवलेल्या नि बहरलेल्या वनश्रीचं जे सौंदर्य होतं ते दूर गेलं. आता ते पाहायचं तर मुद्दाम शहरांपासून दूर जावं लागतं. पर्यटनस्थळ पाहण्याचे नि पिकनिकचे हे दिवस. त्यात एखाद् वेळेस आसपासच्या जंगलाकडे किंवा दऱ्या-डोंगरांकडे मोहरा वळवला तर हे सारं निसर्गाचं देणं भरभरून अनुभवायला मिळेल.
उन्हाळय़ात भरउन्हात (काळजी घेऊन) पळसचं बन, सावरीचा आणि पांगाऱ्याचा लालभडक फुलोरा पाहावा. वसंत ऋतूत नव्याने पालवी फुटलेल्या झाडांचं निरीक्षण करावं आणि खूप थंडी पडली की पानगळीचा आस्वाद घ्यावा. ही जुनी पानं जाता जाता नव्यांसाठी जागा करून देत असतात. कोणाही सजीवाच्या बाबतीत घडतं तेच सजीव वनस्पतींबाबत सत्य असतं. याच काळात विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र थोडय़ा फार प्रमाणात दिसू लागतात. मुंबईतल्या घराच्या पाचव्या मजल्यावरच्या खिडकीत एका थाळीत ठेवलेलं पाणी पिण्यासाठी सध्या आमच्याकडे हळद्या रॉबिन, साळुंकी, बुलबुल, क्वचित कोतवाल पक्षी आणि चिमणीपेक्षाही लहान असा सुंदर सूर्यपक्षी (सनबर्ड) हे ‘पाहुणे’ येतायत. त्यांच्याविषयी पुढच्या लेखात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List