सरकार सुट्टीवर गेले आहे का? नेमके आहे कुठे? मुंबई आणि बीडच्या समस्येवरून आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल
बीड, परभणीच्या विषयावर अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. मुंबईत प्रदूषण वाढलेय त्यावर कुणी उत्तर देत नाही. मुंबईकरांना कमी दाबाने पाणी येतेय त्याकडे कुणाचे लक्ष नाही. सरकार सुट्टीवर गेले आहे का? नेमके आहे कुठे? असा संतप्त सवाल आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबईत निर्माण झालेली पाण्याची समस्या तसेच बीड, परभणीच्या विषयावर महायुती सरकारवर टीका केली. राज्यात कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना सरकारकडून काहीच ठोस कारवाई होत नाही. गेले पाच-सहा दिवस सरकार सुट्टीवर गेले आहे असेच वाटत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
‘पर्यावरणाचा ऱहास होतोय. मुंबईच्या हवेमध्ये धूळ आहे, धुके आहे की धुरके आहे याची सरकारमध्ये कुणालाच काही माहिती नाही आणि त्यावर कुठेही उत्तर येत नाही. मुंबईतील अनेक हाऊसिंग सोसायटय़ा आणि चाळींमध्ये कमी दाबामुळे पिण्याचे पाणीच पोहोचत नाही, पण त्यावर उत्तर द्यायला कुणीच नाही,’ असे टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी सोडले.
‘मुंबईत महानगरपालिका प्रदूषणावर उपाय म्हणून रोज रस्ते धुतेय. पण त्याचा परिणाम पाण्याच्या दाबावर होत आहे. प्रदूषण करणाऱ्या बिल्डरांवर मात्र कारवाई झालेली नाही. यापूर्वीचे मिंधे सरकार बिल्डर आणि कंत्राटदारांचे होते. आताचे भाजपचे सरकार तसे नाही हे त्यांनी दाखवायला हवे,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
बीडमध्ये सरकार नेमके कुणाला वाचवतेय?
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरूनही आदित्य ठाकरे यांनी सरकारला जाब विचारला. वीस दिवस उलटूनही त्या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मीक कराड अद्याप फरार आहे, सरकार नेमके कुणाला वाचवतेय? हे कशासाठी आणि कुणासाठी चालले आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण बीड जिह्यामध्ये संताप आहे, अस्थिरता आहे आणि तेथील लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे की महायुतीचे सरकार नेमके कुणाचे आहे, असे ते म्हणाले. बीडची स्थिती बिहारसारखी झालीय असे माध्यमांनी सांगितले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘बीड आणि परभरणीतील घटनांबाबत भाजपा आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात केलेली भाषणे ऐका. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले तेसुद्धा ऐका. मुख्यमंत्री तातडीने त्यावर कारवाई करतील असे वाटले होते, पण अद्याप कुठेही कारवाई झालेली नाही, असे सांगतानाच, नक्की हे सरकार कुणाला घाबरतेय? कशाला लपाछपी चालली आहे? याचे उत्तर मिळायलाच हवे.’
सामान्य माणसाने नेमके जायचे कुठे?
दरवाढीवरूनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘एसटीचे दर वाढणार आहेत, पाण्याचे दर वाढणार आहेत. बेस्टच्या दरवाढीचा प्रस्तावही पाठवला गेला आहे. पॉपकॉर्नवर जीएसटी लावला जात आहे. दुसऱया बाजूला रुपयाचा दर घसरतोय. महागाई आणि बेरोजगारीने सामान्य माणूस हैराण झालाय. त्यामुळे सामान्य माणसाने नक्की कुठे जायचे असा विचार मनात येतो. पण केंद्रातील सत्ताधारी त्यावर चर्चा करायलाच तयार नाहीत.’
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List