स्कॉर्पिओतील 2 मोबाईल कोणाचे, 16 कॉल केलेला बडा नेता कोण? सीआयडीकडून माहिती देण्यास नकार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडी पथकाला स्कॉर्पिओ गाडीमध्ये 2 मोबाईल मिळाले आहेत, त्यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ आहेत. या मोबाईल फोनवरून एका बड्या नेत्याला 16 फोन केले गेल्याचेही समोर येत आहे. कोण आहे हा बडा नेता, तत्काळ नाव जाहीर करा, अशी मागणी आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून केली.
संतोष देशमुख यांना अडवून त्यांचे अपहरण करण्यात आले होते आणि ज्या गाडीमधून घेऊन गेले होते पुढे याच गाडीतून अज्ञात स्थळी नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली होती आणि त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. ही गाडी पोलिसांनी वाशीजवळ जप्त केली. याच गाडीमध्ये सीआयडी अधिकाऱयांना दोन मोबाईल सापडल्याची माहिती मिळत आहे. त्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ शूटिंग करण्यात आले होते. ते शूटिंग तिघांना पाठवण्यात आल्याचेही समोर आले आहे. तर या मोबाईलवरून एका बडय़ा नेत्याला तब्बल 16 वेळा कॉल करण्यात आल्याचीही चर्चा आहे.
तिघांची चौकशी
आज तिघांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सापडलेले मोबाईल, पाठवण्यात आलेले शूटिंग, करण्यात आलेले बडय़ा नेत्याला कॉल याबाबत अधिकृत माहिती मात्र पोलीस किंवा सीआयडीकडून मिळू शकली नाही. तपास पूर्ण होईपर्यंत सीआयडीकडून अधिकृत माहिती दिली जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. जर खरंच मारहाणीचे व्हिडीओ शूटिंग असेल तर हा मोठा पुरावा आणि मोठे यश तपासासाठी हाती लागले असे म्हणावे लागेल. न्यायालयातसुद्धा हा पुरावा कामी येऊ शकतो.
अजित पवार गटाच्या 40 पदाधिकाऱ्यांची चौकशी
सीआयडीने अजित पवार गटाच्या नेत्यासह 40 पदाधिकाऱ्यांची आज सुमारे आठ तास चौकशी केली. राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांची आज दुपारी 12 वाजल्यापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली.
परभणीत 4 जानेवारी रोजी सर्वपक्षीय शांती मोर्चा
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्य आरोपीस अटक करून देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी परभणीत सर्वपक्षीय सामाजिक संघटना व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱयांच्या झालेल्या बैठकीत शनिवार, 4 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शांती मोर्चा काढण्याचा निर्णय झाला.
याप्रकरणी परभणीत सर्वपक्षीय सामाजिक संघटना व जातीधर्माची बैठक आज पार पडली. यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपीस अद्याप अटक न केल्याच्या निषेधार्थ सामाजिक भावना मोठय़ा प्रमाणावर दुखावलेल्या असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. खुनामागील मास्टरमाइंड वाल्मीक कराड असून, त्यास वाचविणारा मंत्री धनंजय मुंडे आहे. त्यामुळे शासनाने मुख्य आरोपीस अटक केली नाही. सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी परभणीतील सर्व पक्ष, सामाजिक संघटनेने शांती मोर्चा काढण्याचे ठरवले. या मोर्चाला जिह्यातील प्रत्येक गावातून नागरिक उपस्थित राहणार आहेत. महिलांची संख्या मोठय़ा प्रमाणावर राहणार आहे. प्रमुख मागणीचे एक निवेदन तयार करून प्रशासनाला देण्यात येणार आहे. जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालय मैदानावरून हा मोर्चा निघणार असून शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
आरोपींच्या संपत्तीशी देणेघेणे नाही, त्यांना आधी अटक करा! देशमुख कुटुंबीयांचा संताप
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील फरार झालेल्या तीन आरोपींची संपत्ती सील करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीच्या अधिकाऱयांना दिले. याबाबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज माध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया दिली. आरोपींची संपत्ती जप्त करून आम्ही समाधानी होणार नाही. त्यांच्या संपत्तीशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. आरोपींना अटक करा ही आमची मागणी आहे. आज 19 दिवस उलटून गेले, ना आरोपी सापडतात, ना यातील मास्टरमाईंड सापडतो, असा संताप धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला.
प्राजक्ता माळी यांची महिला आयोग, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आज राज्य महिला आयोग तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही महिलांच्या सन्मानाला बाधा येईल असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि माळी यांच्याबाबत यूटय़ूबवर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करणाऱयांवरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
दमानिया यांचे ठिय्या आंदोलन
देशमुख यांच्या मारेकऱयांच्या अटकेसाठी शनिवारी हजारो बीडकरांनी विराट मोर्चा काढला, तर अंजली दमानिया यांनी सत्यशोधक आंदोलन पुकारत ठिय्या देत मारेकऱयांविरोधात दंड थोपटले आहेत. या घटनेच्या मुळापर्यंत गेले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.
फरार वाल्मीक कराडला पुण्यातून अटक केल्याची चर्चा
सीआयडी कसून तपास करत आहे. फरार वाल्मीक कराडसह 4 आरोपींची बँक खाती आज गोठवण्यात आली. याशिवाय फरार आरोपींच्या मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयाकडे अर्ज देखील करण्यात आला. देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवरती आरोपीचे ठसे जुळले आहेत. गाडीतून जप्त करण्यात आलेले दोन्ही मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, खंडणीचा गुन्हा दाखल असलेला वाल्मीक कराड याच्या शोधासाठी वेगवेगळी 13 पथके रवाना करण्यात आली आहेत. रविवारी रात्री कराड याला पुण्यात सीआयडीच्या एका पथकाने अटक केल्याची चर्चा होती. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
धनंजय मुंडे राजीनामा द्या, भाजपची जुनी पोस्ट व्हायरल
महाविकास आघाडी सरकार असताना धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी आरोप केले होते. तेव्हा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुंडे यांचा राजीनामा मागितला होता तर भाजप महिला मोर्चाने आंदोलन केले होते. नेटकऱ्यांनी भाजपच्या या जुन्या पोस्ट व्हायरल करत, आता भाजपा गप्प का असा सवाल केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List