दिल्ली डायरी – ‘झुकेगा नही…’ पण कोण?
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
‘ पुष्पा-2’ चित्रपटाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि त्या प्रकरणात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आली. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी अल्लू अर्जुनला ‘ झुकवले’ खरे, पण या प्रकरणामुळे अल्लू अर्जुन यास सहानुभूती मिळाली तर आणि जनतेने नाकारलेल्या चंद्रशेखर राव यांना आपसूक राजकीय ऑक्सिजन मिळाला तर ‘झुकेगा नही… पण कोण?’ हे भविष्यात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
‘झुकेगा नही साला…’ हा दिलखेचक डायलॉग फेकून देशविदेशात प्रसिद्धीस पावलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला ‘झुकेगा नही’ म्हणत म्हणत तेलंगणा पोलिसांपुढे झुकावे लागले. त्याला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी ‘ पुष्पा-2’ चित्रपटप्रसंगी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अटक करून तुरुंगात डांबले. अल्लू अर्जुन कोणतीही पूर्वसूचना न देता चित्रपट पाहायला आला. त्यावेळी त्याला पाहायला प्रचंड गर्दी उसळली. त्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. झाले हे दुर्दैवीच होते. मृत महिलेला व जखमींना मोठी आर्थिक मदत अल्लू अर्जुनने केली. हे प्रकरण मिटले असे वाटत होते, मात्र झाले उलटेच.
आपल्या देशात कधी कोणत्या मुद्दय़ावरून राजकारण होईल हे सांगता येत नाही. अल्लू अर्जुनला अद्दल शिकवली तर आपण ‘गोरगरीबांचे मसिहा’ बनू, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना वाटले. चित्रपटाच्या पडद्यावर शंभर दोनशे गुंडांना एका फटक्यात लोळवणारा व झुकेगा नही म्हणत सिस्टीमला ललकारणारा अल्लू अर्जुन आपली ‘शिकार’ होतोय म्हटल्यावर रेवंथ अधिकच एक्साईटेड झाले आणि नको ती चूक करून बसले.
अल्लूला अटक केल्यावर गोरगरीबांचे मसिहा बनणे दूर, अल्लूचे समर्थक व जनतेत संतापाची लाट निर्माण झाली आहे. ज्या तेलंगणाच्या जनतेने चंद्रशेखर राव व त्यांचा कुटुंबकबिला घरी बसवला त्या चंद्रशेखर रावांना आता अल्लूमुळे ‘अच्छे दिन’ येताना दिसताहेत. काँग्रेस हायकमांडने तेलंगणाचे त्यांचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना जनहिताच्या कामाला लावलेले बरे. झुकेगा नही म्हणणारा अल्लू सध्या झुकला असला तरी भविष्यात त्याच्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूती मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना झुकवू शकते ही भीती आहेच.
तेलंगणाचे मुख्यमंत्री बनून रेवंथ रेड्डी यांना जेमतेम वर्ष झाले, मात्र त्यांच्याविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. रेवंथ यांच्या लोकप्रियतेत घसरण होत आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी सरकारी कचेरीऐवजी बीआरएसच्या कार्यालयांमध्ये जात आहे. ही काँग्रेससाठी खरोखरच चिंतेची बाब आहे. आपल्याविरोधात माहोल बनत आहे हे लक्षात आल्यावर रेवंथ यांनी त्यात सुधारणा करण्याऐवजी जालीम उपाय शोधला तो म्हणजे अल्लू अर्जुनला तुरुंगात टाकणे.
अल्लू आंध्र, तेलंगणात फक्त व्यवसाय करण्यासाठी येतो. त्याला कुठलीही बांधिलकी नाही, असा प्रचार रेवंथ यांनीच सुरू केला, मात्र तो उलटा पडला. चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेले लोकही अल्लूच्या पाठीशी उभे राहिले. अल्लूने सरकारी मदतीवर अवलंबून न राहता स्वतःच्या खिशातून जखमींवर उपचार केल्यामुळे अल्लू अर्जुन ‘हीरो’ बनला. दक्षिणेकडचे राजकारण हे व्यक्ती केंद्रित असते. त्यात सिनेमा कलाकारांचे दक्षिणेच्या राजकारणातले महात्म्य तर सांगायलाच नको. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे तेलंगणासारखे राज्य काँग्रेसच्या पदरात पडले आहे. ते हातातून जाऊ नये यासाठी काँग्रेस हायकमांडने आताच हस्तक्षेप करायला हवा.
फोटोग्राफीवरून घाणेरडे राजकारण
आपल्या देशात राजकारण खालच्या थराला गेले आहे. मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेवेळी मीडियाच्या फोटोग्राफरवरून जे राजकारण घडले ते शिसारी आणणारे आहे. हल्ली मीडियालाही शिक्के मारण्याचे प्रकार सुरू आहेत. असे प्रकार सुरू झाले त्याला दहा वर्षे होतील. हा आपला तो विरोधी विचारांचा म्हणजे ‘अर्बन नक्षली’ किंवा देशद्रोही, अशी विशेषणे चिकटवून टाकली की विषय संपतो! त्यातून पूर्वी राजा महाराजांच्या जशा आवडत्या नावडत्या राण्या असायच्या तसा आवडता मीडिया (गोदी मीडिया) आणि नावडता मीडिया असे दोन गट पाडले गेले. मनमोहन सिंग यांच्या अंतिम संस्कारांचे कव्हरेज करण्याची परवानगी केवळ दूरदर्शन व एएनआय या दोन वृत्तसंस्थांना देण्यात आली. यापैकी मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेस कार्यालयात आल्यानंतर तिथे दूरदर्शनच्या कॅमेरामनला कॅमेरा बंद करायला सांगण्यात आले. फक्त एएनआयचा कॅमेरा सुरू राहिला. निगमबोध घाटावर पार्थिव घेऊन जात असताना सरकारने फक्त दूरदर्शनचाच कॅमेरा कसा सुरू राहील व त्याचा ‘फोकस’ फक्त भाजप नेत्यांवरच कसा राहील, याची ‘दक्षता’ घेतली. राजकारणाच्या इतक्या घसरलेल्या पातळीवर आता काय बोलावे?
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List