सामना अग्रलेख – इतिहासात या कृतघ्नपणाची नोंद राहील
डॉ. मनमोहन सिंग यांना मोदी सरकारने अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रीय स्मारक स्थळावर जागा नाकारली. हा या सरकारचा कद्रूपणा आहे. जनतेच्या हृदयातील डॉ. मनमोहन सिंग यांचे स्थान मोदी व त्यांच्या लोकांना पुसून टाकता येणार नाही. मोदी सरकारने राजघाटावर मनमोहन सिंगांना दोन मीटर जागा नाकारली. मृत्यूनंतर कोणतेही वैर राहत नाही, असे हिंदू धर्म आणि हिंदुत्व सांगते. मोदी–शहांचे हिंदुत्व सूडाच्या शाईने लिहिलेले आहे, असे दिसते. इतिहासात या कृतघ्नपणाची नोंद राहील.
सध्याचा हिंदुस्थान म्हणजे मोदी-शहा सरकारच्या बापजाद्यांची कमाई नाही. तरीही माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी दोन मीटर जमीन नाकारण्यात आली व देशाला अर्थसंकटातून बाहेर काढणाऱ्या या असामान्य माणसाला निगमबोध घाट स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला. याविषयी लाखो हिंदुस्थानीयांच्या मनात हळहळ झाल्याशिवाय राहणार नाही. डॉ. मनमोहन सिंग यांनी अखंड देशसेवा केली. ते दहा वर्षे पंतप्रधानपदी होते. या दहा वर्षांत त्यांनी देशाला आर्थिक अराजकातून बाहेर काढले व मध्यमवर्गीयांना अच्छे दिन दाखवले. डॉ. सिंग यांचे जेवढे शिक्षण आहे तेवढे शिक्षण संपूर्ण भाजप मिळून नसावे. एक ज्ञानी म्हणून जगात त्यांचा गौरव होत असे. हा गौरव भारत देशाचा होता. अशा गौरवशाली नेत्याच्या अंत्यसंस्कारासाठी ज्या ठिकाणी त्यांचे स्मृतिस्थळ उभारले जाईल, अशाच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार व्हावेत, ही अत्यंत साधी आणि योग्य मागणी मान्य करण्यास मोदी सरकारने नकार दिला. हा त्यांच्या मनाचा कद्रूपणा व जळफळाट आहे. डॉ. सिंग हे मोठे होतेच, पण त्यांच्या मृत्यूने मोदी व त्यांच्या सरकारला छोटे केले आहे. अर्थात सध्याच्या राज्यकर्त्यांना डॉ. मनमोहन सिंग यांची उंची कधीच गाठता येणार नाही. मनमोहन सिंग यांना जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘आम्ही आमचा प्रिय मित्र गमावला’, असे रशिया, अमेरिका, चीनसारख्या राष्ट्रांनी म्हटले. आपल्या काळात डॉ. सिंग यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत प्रचार केला नाही. नमस्ते बुश किंवा नमस्ते ओबामासारखे उत्सव साजरे केले नाहीत. जगातल्या कोणत्याही नेत्यास शिष्टाचार सोडून मिठ्या मारताना मनमोहन दिसले नाहीत. ते ताठ मानेने जगले. जगातल्या अनेक संसदीय सभागृहांत त्यांनी केलेली भाषणे गाजली. त्यात दूरदृष्टी, मार्गदर्शन व आत्मविश्वास होता. डॉ. सिंग यांना कधीच भाषणासाठी ‘टेलिप्रॉम्प्टर’ची गरज भासली नाही व त्यांनी आपल्या वक्तव्यात कधीच अटलबिहारी, आडवाणी, गोळवलकर गुरुजी, डॉ. हेगडेवार यांचा अपमान केला नाही. 1984 च्या दंगलीत शिखांचे हत्याकांड झाले. त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. त्याचे खापर त्यांनी डॉ. हेगडेवार किंवा गोळवलकर गुरुजींवर फोडले नाही. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यपद्धतीत पंडित नेहरूंचे प्रतिबिंब दिसत असे.
विकास-विज्ञानाच्या मार्गाने
ते देशाची बांधणी करत होते. रुपया कोसळतो तेव्हा जगात देशाची प्रतिष्ठा कोसळते, असे श्री. मोदी त्यांच्या भाषणात म्हणत. मोदी स्वतः पंतप्रधान झाले तेव्हा रुपया आणि देशाची किंमत कोसळू लागली. कारण देश हिंदू-मुसलमानांत तणाव करून चालवला जात नाही, तर 140 कोटी लोकसंख्येच्या गरजा, त्यांचे अर्थशास्त्र समजून घ्यावे लागते. डॉ. मनमोहन सिंग यांनी देशात उदारीकरण आणले. भारताचे दरवाजे जागतिक गुंतवणूकदारांसाठी खुले केले. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या हातातही पैसा खेळू लागला. हे काम त्यांनी धाडसाने केले. मोदी यांना उदारीकरण व खासगीकरण यातला फरक समजला नाही. त्यांनी विमान कंपन्या, विमानतळ, बंदरे, तेल कंपन्यांचे खासगीकरण करून सर्व संपत्ती त्यांचा मित्र गौतम अदानी यांना सोपवली. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे उदारीकरण केले. मोदी यांनी खासगीकरण केले. त्यामुळे मोदी सरकारने डॉ. मनमोहन यांच्यावर राग धरून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दोन मीटर जमीन नाकारली. मुंबई, दिल्लीतील जमिनी आता अदानीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी हव्या असलेल्या जमिनीसाठी काँगेसने अदानी यांच्याकडे विनंती अर्ज करायला हवा होता काय? ‘maker of post – modern India’ असा उल्लेख मनमोहन सिंग यांच्याबाबत करण्यात येत आहे. त्याचा अर्थ सिंग यांना अंत्यसंस्कारासाठी जागा नाकारणाऱ्यांनी समजून घेतला पाहिजे. अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन 16 ऑगस्ट 2018 ला झाले. तेव्हा पंतप्रधान मोदी होते. अटलजींचे अंत्यसंस्कार राष्ट्रीय स्मृतिस्थळावर झाले. जेथे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांचे अंतिम संस्कार होतात व ही जागा त्यासाठी राखीव आहे. येथे अटलजींचे अंत्यसंस्कार झाले व त्यांच्या समाधी स्थळासाठी सात एकर जमीन देण्यात आली, पण डॉ. मनमोहन सिंग यांना मात्र त्याच स्थळी दोन मीटर जमीन नाकारली. हा कृतघ्नपणा आहे. खरे तर मनमोहन सिंग यांचे मोठेपण त्यांचे अंत्यसंस्कार कोठे झाले यावर अवलंबून नाही, मात्र त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी दोनेक मीटर जागा नाकारून आपला
प्रामाणिकपणाचा द्वेष
किती पराकोटीचा आहे हेच भाजप सरकारने दाखवून दिले. मोदींचे सरकार हे चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार यांच्या कुबडय़ांवर टिकून आहे. मोदी सरकारचे हे जे मृत्यूनंतरच्या द्वेषाचे राजकारण, तेही डॉ. मनमोहन सिंगांच्या बाबतीत सुरू आहे, ते या दोघांना मान्य आहे का, याचा खुलासा चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्याकडून होणे गरजेचे आहे. मनमोहन सिंग हे देशाचे सगळय़ात यशस्वी अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री होते. तरीही ते राजकीय नेते बनू शकले नाहीत. हे खरे असले तरी पक्ष फोडणे, सरकारे फोडणे, विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आपल्याकडे खेचण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करण्यासारखे लोकशाहीविरोधी उद्योग मनमोहन सिंग यांनी केले नाहीत. भाजपात नाराज असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी काँगेसमध्ये प्रवेश करण्याचा मुहूर्त ठरवला; पण लोकसभेत विरोधी पक्षाचे उपनेते असलेल्या व्यक्तीचे हे पक्षांतर मनमोहन सिंग यांना मान्य नव्हते व मुंडे यांचे पक्षांतर त्यांनी रोखले. बहुधा याच त्यांच्या दुर्लभ गुणांमुळे पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारने मनमोहन यांच्या अंत्यसंस्कारासाठी दोन मीटर जमीन नाकारली असावी. प्रामाणिकपणाची ही अॅलर्जीच म्हणायला हवी. जागतिक-आर्थिक संकटाशी सामना करून भारताची अर्थव्यवस्था मजबूत बनवणाऱ्या मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्याचा कधीच डांगोरा पिटला नाही. राजकीय विरोधकांशी सूडाने वागण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजेच ‘जेएनयू’त मनमोहन सरकारविरुद्ध आंदोलन सुरू झाले. त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाने ‘जेएनयू’ प्रशासनात प्रथमच हस्तक्षेप करून सूचना दिल्या की, विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नका व आंदोलक विद्यार्थ्यांना विद्यापीठातून बडतर्फ करू नका. राज्यकर्त्यांची संवेदनशीलता ही अशीच असावी लागते. डॉ. मनमोहन सिंग यांना मोदी सरकारने अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रीय स्मारक स्थळावर जागा नाकारली. हा या सरकारचा कद्रूपणा आहे. मात्र निगमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव पोहोचताच देशवासीयांना हुंदके फुटले. स्वतः राहुल गांधी यांना अश्रू अनावर झाले. जनतेच्या हृदयातील डॉ. मनमोहन सिंग यांचे स्थान मोदी व त्यांच्या लोकांना पुसून टाकता येणार नाही. मोदी सरकारने राजघाटावर मनमोहन सिंगांना दोन मीटर जागा नाकारली. मृत्यूनंतर कोणतेही वैर राहत नाही, असे हिंदू धर्म आणि हिंदुत्व सांगते. मोदी-शहांचे हिंदुत्व सूडाच्या शाईने लिहिलेले आहे, असे दिसते. इतिहासात या कृतघ्नपणाची नोंद राहील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List