‘अटक तर सोडाच तुम्ही वाल्मिकी कराड साहेबांना साधी नोटीसही…’, सदावर्तेंचं मोठं वक्तव्य; धस यांना थेट आव्हान
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आज वीस दिवस झाले आहेत, मात्र या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात अजूनही पोलिसांना यश आलेलं नाही. यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं आहे. वाल्मिकी कराड यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. आमदार सुरेश धस हे या प्रकरणात आपली भूमिका अतिशय आक्रमकपणे मांडत आहेत. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला. या मोर्चात देखील वाल्मिकी कराड यांना अटक करावी, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान आता या प्रकरणात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
‘धस नावाचे आमदार आहेत त्यांचा मला निषेध करायचा आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे राजकारण किती करायचे याला मर्यादा असतात. व्यक्तिगत राजकारणासाठी तुम्ही तो मोर्चा काढला होता, परंतु तो शिमगा वाटत होता. मोर्चात टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या तो दुखवटा होता की काय होता? दुःख आणि दुखवटा कशाला म्हणतात ते एसटीतल्या कर्मचाऱ्यांकडून शिका असा हल्लाबोल सदावर्ते यांनी सुरेश धस यांच्यावर केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, वाल्मिकी कराड साहेबांना अटक करा असं तुम्ही म्हणताय पण ते वाल्मिकी कराड साहेब आतापर्यंत कुठल्या एफआयआरमध्ये आहेत का? आधी फाशी आणि नंतर चौकशी असा कायदा आहे का जगात? धनंजय मुंडे वंजारी आहेत म्हणून टार्गेट करत आहात का? कालच्या मोर्चात काही म्होरके सोडले तर कोणी सुद्धा नव्हतं. कालचा मोर्चा असंवैधानिक होता. वाल्मिकी कराड साहेब मर्डर मध्ये आरोपीच नाही तर मग त्यांना नोटीस तरी देता येईल का? अटक करण्यासाठी पुरावे लागातत, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. तसेच सुरेश धस यांचे कार्यकर्ते मला धमकी देत आहेत, जीवे मारण्याची धमकी मला दिली आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List