हैदराबाद पोलिसांकडून ‘पुष्पाराज’ला समन्स; चेंगराचेंगरीप्रकरणी कसून होणार चौकशी
‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरदरम्यान हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी समन्स बजावले आहेत. याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर त्याची सुटका झाली. त्यानंतर घटनेच्या चौकशीसाठी हैदराबाद पोलिसांनी त्याला समन्स बजावले आहेत. अल्लू अर्जुनला आज (मंगळवार) पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या प्रीमिअरचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या प्रीमिअरला जेव्हा अल्लू अर्जुन पोहोचला, तेव्हा थिएटरबाहेर चेंगराचेंगरी झाली. त्यात एम. रेवती नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिच्या नऊ वर्षांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अल्लू अर्जुनला समन्स
अल्लू अर्जुनला आज सकाळी 11 वाजता चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. या समन्सच्या पार्श्वभूमीवर अल्लू अर्जुन त्याच्या लीगल टीमसोबत विविध मुद्दयांवर चर्चा करत आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अल्लू अर्जुन, थिएटर व्यवस्थापन आणि अभिनेत्याच्या टीमविरोधात निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी सिटी कोर्टने त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. याविरोधात त्याने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
पोलिसांकडून फुटेज जारी
अल्लू अर्जुनचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी पोलीस उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्याला समन्स बजावण्यात आले आहेत. हैदराबाद पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी रविवारी सांगितलं की पोलीस कायदेशीर अभिप्राय घेतल्यानंतर पुढील पावलं उचलतील. अल्लू अर्जुनने त्याच्या विरोधातील आरोप फेटाळल्यानंतर पोलिसांनी संध्या थिएटरमधील घटनेचे मिनिटा-मिनिटाचे सीसीटीव्ही फुटेज जारी केलं. 4 डिसेंबर रोजी काय घडलं याची स्पष्ट माहिती देण्यासाठी पोलिसांनी 10 मिनिटांचा व्हिडीओ जारी केला. 1000 क्लिप्सचं विश्लेषण केल्यानंतर हा व्हिडीओ संकलित करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी विधानसभेत बोलताना अल्लू अर्जुनवर पोलिसांच्या परवानगीशिवाय थिएटरला भेट दिल्याबद्दल आणि चेंगराचेंगरीनंतरही रोड शो केल्याबद्दल जोरदार टीका केली. त्याच दिवशी अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List