Reel साठी विधानसभा अध्यक्षांच्या वाहनाला केलं ओव्हरटेक, पोलिसांनी 5 तरुणांची झिंग उतरवली
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्यांच्या आधारे रोज नवनवीन आणि हटके व्हिडीओ पोस्ट केले जातात. काही व्हिडीओ प्रेरणादाई तर काही व्हिडीओ अगदीच थुकरट स्वरुपाचे असतात. परंतु राजस्थानमध्ये काही तरुणांनी रिल बनवण्यासाठी थेट विधानसभा अध्यक्षांनाच आपल्या व्हिडीओमध्ये घेण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राजस्थान विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी अजमेर वरून जयपूरच्या दिशेने जात होते. याच दरम्यान अजमेर-जयपूर महामार्गावर एक i20 गाडी त्यांचा पाठलाग करायला लागली. एकदा उजवीकडून आणि एकदा डावीकडून धोकादायक पद्धतीने ते विधानसभा अध्यक्षांच्या गाडीला ओव्हरटेक करत होते. विधानसभा अध्यक्षांसोबत असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना अनेक वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते काही थांबले नाहीत. शेवटी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कंट्रोल रुमला सदर प्रकाराची माहिती दिली. त्यानतंर पोलिसांनी टोल नाक्यावर कडेकोट बंदोबस्त केला. परंतु पोलिसांनी लावलेले बॅरिकेट तोडून तरुण पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी गाडीच्या नंबरवरुन तरुणांची ओळख पटवली आली त्यांना अटक केले आहे.
यासंदर्भात पोलीस अधिकारी अमित कुमार यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, तरुणांनी अजमेर रोडवर विधानसभा अध्यक्ष आणि पोलिसांची गाडी पाहून रिल बनवून सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी गाडीचा पाठलाग करत ओव्हरटेक केला होता. याप्रकरणी आरोपी गणेश सैनी, राहुल कुमावत, साहिल कुमावत, लोकेश यादव आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List