शाळेत घुसून विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे प्रकरण, दिव्यातील 29 बेकायदा शाळांवर गुन्हे
दिव्यातील बेकायदा शाळेत घुसून अज्ञात विकृताने पाचवीतील विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता शिक्षण विभाग खडबडून जागे झाले आहे. या प्रकरणानंतर शिक्षण विभागाकडून स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कूलसह दिव्यातील 27 व मुंब्यातील दोन अशा एकूण 29 बेकायदा शाळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच लवकरच उर्वरित अनधिकृत ३२ शाळांवरदेखील कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याने संचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. दरम्यान गुन्हे दाखल झालेल्या बेकायदा शाळांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 69 शाळा बेकायदा असून त्यापैकी तब्बल 61 शाळा या केवळ दिव्यात आहेत. या बेकायदा शाळांविरोधात शिक्षण विभागाने या आधीदेखील अनेक वेळा नोटिसा बजावून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून या बेकायदा शाळांवर दंडात्मक कारवाई करून शाळा बंद करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. याप्रकरणी वारंवार नोटिसा बजावूनही संचालकांनी प्रशासनाची दिशाभूल करत व आदेश धाब्यावर बसवत राजरोसपणे शाळा सुरू ठेवल्या आहेत. दिव्यातील स्मार्ट एज्युकेशन शाळेतील विद्यार्थिनीसोबत झालेल्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर शिक्षण विभाग अधिकाऱ्यांनी दिवा व मुंब्यातील शाळांना भेट देऊन त्यांच्याकडे शासन मान्यतेच्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र कोणतीही अधिकृत कागदपत्रे 29 शाळांचे संचालक देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली.
विकृत अद्याप फरार
3 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता विद्यार्थिनीचा पाठलाग करून वर्गात घुसलेल्या विकृताने तिच्यासोबत गैरवर्तन केले. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा दिवस उलटले तरी अद्याप आरोपी फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी मुंब्रा पोलिसांनी विविध पथके नेमली आहेत.
या शाळांवर कारवाई
आरंभ इंग्लिश स्कूल, रेन्बो इंग्लिश स्कूल, आर. एल. पी. हायस्कूल, केंब्रिज इंग्लिश स्कूल, स्मार्ट एज्युकेशन, यंग स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कूल, एस. आर. इंग्लिश स्कूल, एस. एस. इंडिया हायस्कूल, स्मार्ट इंटरनॅशनल स्कूल, एस. एम. ब्रिलियंट इंग्लिश स्कूल, एस. आर. पी. इंग्लिश स्कूल, न्यू मॉडर्न डिस्कव्हरी, एस. डी. के. इंग्लिश स्कूल, डॉन बॉस्को स्कूल, मदर टच, लिटिल विगम, आर. एम. फाऊंडेशन, ग्रीन वर्ल्ड स्कूल, जॉय इंग्लिश स्कूल, ज्ञानगुरू इंग्लिश स्कूल, कुबेरेश्वर महादेव इंग्लिश स्कूल, जिनियस इंग्रजी संकुल, ऑर्बिट इंग्लिश स्कूल, जायुती विद्यालय सेमी इंग्रजी स्कूल, नंदछाया विद्यानिकेतन, सेंट सिमोन हायस्कूल, श्री राम कृष्ण इंग्लिश स्कूल, द चॅम्पियन हायस्कूल, बुरहाणी स्मार्ट चॅम्प.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List