भाजपची कल्याण पश्चिममध्ये डोकेदुखी वाढली, काँग्रेस बंडखोराच्या माघारीमुळे सचिन बासरेंचे पारडे जड
कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसचे नेते राजाभाऊ पातकर यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली असतानाच भाजपाचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी आपली बंडखोरी कायम ठेवल्याने महायुतीला त्याचा आगामी निवडणुकीत मतविभाजनाचा मोठा फटका बसू शकतो. आज अर्ज मागे घेण्याची मुदत संपली तेव्हा माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही माघार घेतली. यामुळे आता कल्याण पश्चिम विधानसभेत महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर, महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बासरे, मनसेचे उमेदवार उल्हास भोईर आणि भाजपा बंडखोर वरुण पाटील यांच्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची आज दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ होती. त्यामुळे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि विद्यमान शहराध्यक्ष वरुण पाटील हे दोघेही काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र त्याविरोधात भाजपचे कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि विद्यमान शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी दंड थोपटत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. हे अर्ज मागे घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पक्षश्रेष्ठाRकडून पवार आणि पाटील या दोघांच्याही मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. या मनधरणीला काही प्रमाणातच यश आले आणि नरेंद्र पवार यांनी आपला अर्ज मागे घेतला तर वरुण पाटील यांनी मात्र निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणे पसंत केले आहे. विधानसभा मतदारसंघात आता महायुतीचे विश्वनाथ भोईर, महाविकास आघाडीचे सचिन बासरे, मनसेचे उल्हास भोईर आणि भाजपा बंडखोर वरुण पाटील यांच्यात खरी लढत पाहायला मिळणार आहे.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण 30 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्याकडे सादर केले होते. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अरविंद मोरे, मोनिका पानवे, नरेंद्र मोरे, राजकुमार पातकर, अश्विनी मोकासे आणि नरेंद्र पवार या 6 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List