“आमच्या नात्यात बरीच तडजोड..”; अभिषेकसोबतच्या भांडणांबद्दल काय म्हणाली ऐश्वर्या?
अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या 51 व्या वाढदिवशी पती अभिषेक आणि बच्चन कुटुंबीयांकडून शुभेच्छांची कोणतीच पोस्ट न दिसल्याने पुन्हा एकदा या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. एरव्ही बिग बीसुद्धा सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहित असतात. मात्र सुनेच्या वाढदिवशी मात्र त्यांनी कोणतीच पोस्ट लिहिली नव्हती. याउलट काही दिवसांपूर्वीच बिग बींच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने मात्र त्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली होती. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या तिच्या आणि अभिषेकच्या नात्यात येणाऱ्या आव्हानांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती.
“या नात्यात बरीच तडजोड आहे, बरीच देवाणघेवाण आहे. अर्थातच आमच्यातही मतभेद होतात. पण संवाद कायम ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. यावर मी नेहमी विश्वास ठेवते”, असं ऐश्वर्या ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. याविषयी तिने पुढे सांगितलं, “अभिषेक या गोष्टीचा खूप आदर करतो. नात्यात संवाद खूप महत्त्वाचा असतो. एखाद्या नात्याची सुरुवात मैत्रीपासूनच होते ना? मग मैत्रीचा अर्थ काय असतो? मी अशा लोकांपैकी नाही जे म्हणतात की आज गप्प बस आणि उद्या विषय सोडुयात. जर विषय उद्यावर ढकलण्यासारखा असेल तर ते उद्यावरच जाईल. पण तुम्ही जर का आज विषय संपवू शकलात तर चांगलीच गोष्ट आहे. पण माझ्या नियमांच्या पुस्तकात या दोन्ही गोष्टी बसत नाहीत. प्रत्येक दिवसाकडे पाहण्यात काही अंतिम नाही. तुम्ही एकमेकांसोबत कसा वेळ घालवता याविषयी खुल्या मनाने विचार करावा लागेल. याचा अर्थ असाही होतो की तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आदर करताय आणि त्याविषयी संवेदनशील आहात.”
अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी 2007 मध्ये लग्नगाठ बांधली. 16 नोव्हेंबर 2011 रोजी ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. आराध्या आता 13 वर्षांची होणार आहे. ऐश्वर्या नुकतीच मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटात झळकली होती. दोन भागांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि दोन्ही भागात ऐश्वर्याने दमदार भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला पुरस्कारसुद्धा मिळाला होता. तर दुसरीकडे अभिषेकचा ‘आय वाँट टू टॉक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक ‘पिकू’ फेम शूजित सरकार करत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List