खूपच बारिक दिसतेय, वजन वाढव.. म्हणणाऱ्याला समंथाने दिलं सडेतोड उत्तर
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी ‘सिटाडेल: हनी बनी’ या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सीरिजच्या प्रमोशननिमित्त ती विविध कार्यक्रमांना उपस्थित राहत असून काही मुलाखतीसुद्धा देत आहे. समंथाचे विविध फोटो आणि व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात नेटकऱ्यांना एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय ते म्हणजे समंथाचं घटलेलं वजन. यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर समंथाने नुकतंच इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला असता, तिथेही एका नेटकऱ्याने तिला वजन वाढवण्याचा सल्ला दिला. या ट्रोलिंगला वैतागून अखेर समंथाने उत्तर दिलं आहे.
समंथाच्या इन्स्टाग्रामवरील सेशनदरम्यान एका युजरने लिहिलं होतं, ‘मॅडम कृपया थोडं तरी वजन वाढवा, खूपच बारिक दिसत आहात.’ ही कमेंट वाचून समंथाने व्हिडीओद्वारे ट्रोलर्सना उत्तर दिलं. ती म्हणाली, “वजनावरून आणखी एक कमेंट. माझ्या वजनाबद्दलच्या कमेंट्सची मी एक थ्रेडच सोशल मीडियावर पाहिली आहे. तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल तर मी सांगू इच्छिते की मी कठोर अँटी-इन्फ्लामॅटरी डाएटवर आहे. माझ्या आरोग्याच्या स्थितीसाठी हा डाएट अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यामुळे मी माझं वजनही वाढवू शकत नाही. या डाएटमुळे माझं वजन आवश्यकतेनुसार ठराविक राहतं आणि माझ्या आजारासाठीही (मायोसिटीस) ते खूप गरजेचं आहे. लोकांबद्दल मतं बनवणं बंद करा. त्यांना जसं राहायचंय तसं राहू द्या. जगा आणि जगू द्या. कृपया ही गोष्ट समजून घ्या, आपण 2024 मध्ये जगतोय.”
समंथाने 2022 मध्ये तिला मायोसिटीस हा ऑटोइम्युन आजार असल्याचा खुलासा केला होता. मायोसिटीस या ऑटोइम्युन आजारामुळे समंथाने काही काळ कामातून ब्रेक घेतला होता. ‘खुशी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला या आजाराचं निदान झालं होतं आणि त्यानंतर तिने उपचारासाठी ब्रेक घेतला होता. उपचारानंतर समंथा आता पुन्हा कामावर परतली आहे. मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ (वेदना). याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List